जिल्हा पंचायतीच्या निवडणूकीत काँग्रेस लढवणार अडतीस जागा

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 12 मार्च 2020

पणजी: काँग्रेसने आत्तापर्यंत जिल्हा पंचायतीची निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढविली नाही. परंतु, कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे पक्षाने यावेळची जिल्हा पंचायत निवडणूक पक्षाच्या अधिकृत चिन्हावर लढविण्याचे ठरविले आहे. यावेळी ५० पैकी ३८ जागांवर पक्षाने आपले उमेदवार दिले असून, ताळगाव आणि बार्से या ठिकाणच्या अपक्षांना काँग्रेसने पाठिंबा दिला असल्याची माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

पणजी: काँग्रेसने आत्तापर्यंत जिल्हा पंचायतीची निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढविली नाही. परंतु, कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे पक्षाने यावेळची जिल्हा पंचायत निवडणूक पक्षाच्या अधिकृत चिन्हावर लढविण्याचे ठरविले आहे. यावेळी ५० पैकी ३८ जागांवर पक्षाने आपले उमेदवार दिले असून, ताळगाव आणि बार्से या ठिकाणच्या अपक्षांना काँग्रेसने पाठिंबा दिला असल्याची माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

या परिषदेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, प्रदेश युवा काँग्रेसचे वरद म्हार्दोळकर, प्रवक्ते उर्फान मुल्ला, जनार्दन भंडारी, विजय भिके यांची उपस्थिती होती.
कामत म्हणाले की, आम्ही यावेळी कोणत्याही पक्षाशी युती केलेली नाही. जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी पक्षाच्या चिन्हांवर निवडणूक लढवावी, असा आग्रह धरला आणि हा आग्रह अधिक वाढल्याने अखेर पक्षाने अधिकृत चिन्हावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. ३८ ठिकाणी पक्षाने उमेदवार दिले आहेत.

ताळगाव येथे अपक्ष उमेदवार सिसीला रॉड्रिग्स आणि बार्सेमध्ये संदेश गावकर या अपक्षांना काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. दहा ठिकाणी भाजपच्या उमेदवारांना पराभूत करू शकणाऱ्या अपक्ष उमेदवारांना आम्ही पाठिंबा दिला आहे. त्यात तोरसे, धारगळ, कवळे, बेतकी खांडोळा, कारापूर, सर्वण, वेलिंग, प्रियोळ, बोरी आणि शिरोडा याठिकाणी काँग्रेसने भाजपविरोधी प्रबळ अपक्ष उमेदवारास पाठिंबा दिला आहे.

काँग्रेस पक्षावर जिल्हा पंचायत निवडीबाबत सांकवाळच्या उमेदवाराविषयी आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नाविषयी विचारणा केली असता कामत म्हणाले की, आपण काँग्रेसचा ज्येष्ठ आमदार म्हणून पक्षाच्या सर्व आमदारांकडे आणि खासदाराकडे जिल्हा पंचायत निवडणुकीतील उमेदावारांविषयी चर्चा केली आहे. रवी नाईक यांच्याशी फक्त चर्चा करावयाची राहिली होती. त्यानंतरच उमेदवारांची यादी निश्‍चित केल्याचे कामत म्हणाले. त्याचबरोबर काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहनही त्यांनी केले. तसेच सांकवाळ मतदारसंघात जो काही प्रकार घडला आहे, त्यास आपण जबाबदार असल्याचे गिरीश चोडणकर यांनी सांगितले आणि या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

मतदारयाद्या देण्यास टाळाटाळ!

काँग्रेसच्या कार्यालयीन प्रतिनिधींना जिल्हा पंचायत निवडणुकीविषयी माहिती दिली. उमदेवार निवडून आणण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर गट व्यवस्थापनाविषयी माहिती देण्यात आली असून, आम्ही घरोघरी भेटी देण्यावर भर दिला आहे. मतदारांमध्ये भाजप सरकारविरुद्ध राग आहे, २०१७ मध्ये काँग्रेसवर भाजपने अन्याय केल्याची त्यांना कल्पना आहे.

जिल्हा पंचायत निवडणूक जिंकून भाजपला काँग्रेस दमदार उत्तर देईल. त्याचबरोबर मतदारांच्या याद्या राज्य निवडणूक मुख्य अधिकारी काँग्रेस पक्षाला देत नाही, भाजपच्या कार्यालयात या याद्या यापूर्वीच दाखल झाल्या आहेत. मतदारांना नंबर देण्यासाठी याद्या महत्त्वाच्या असल्याने भाजप सरकार काँग्रेसला त्या मिळू नये, यासाठी प्रयत्न करीत आहे. आम्ही किमान मतदारांच्या नावांची प्राथमिक प्रत द्यावी, अशी मागणी केली पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. भाजप सरकार काँग्रेसची कोणत्या ना कोणत्या बाजूने काँग्रेसला सतावत असल्याचे चोडणकर यांनी नमूद केले,
 

संबंधित बातम्या