‘ई चलन’ कारवाईत ‘कनेक्टिव्हीटी’चे विघ्‍न

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 11 मार्च 2020

पणजी: वाहतूक पोलिस विभाग कारवाईबाबत ‘डिजीटल’ झाला, तरी त्यांना ‘ई चलन’साठी दिलेल्या यंत्रात कनेक्टिव्हीटीचा अडथळा येत आहे. हे यंत्र हाताळण्यात काही पोलिस कर्मचाऱ्यांना अडचण येत असल्याने पूर्वी दैनंदिन नोंद होणाऱ्या कारवाईच्या प्रकरणांमध्ये काही प्रमाणात घट झाली आहे. ज्या भागात कंपनीच्या सिमकार्डला ‘रेंज’ मिळते त्यानुसार या यंत्रामध्ये त्याचा वापर केला जात असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

पणजी: वाहतूक पोलिस विभाग कारवाईबाबत ‘डिजीटल’ झाला, तरी त्यांना ‘ई चलन’साठी दिलेल्या यंत्रात कनेक्टिव्हीटीचा अडथळा येत आहे. हे यंत्र हाताळण्यात काही पोलिस कर्मचाऱ्यांना अडचण येत असल्याने पूर्वी दैनंदिन नोंद होणाऱ्या कारवाईच्या प्रकरणांमध्ये काही प्रमाणात घट झाली आहे. ज्या भागात कंपनीच्या सिमकार्डला ‘रेंज’ मिळते त्यानुसार या यंत्रामध्ये त्याचा वापर केला जात असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

सुमारे ४०० ई चलन यंत्रे पोलिस खात्याच्या पोलिसांकडून वापरली जात असली, तरी त्यातील ७५ टक्के यंत्रांचा वापर वाहतूक पोलिस करत आहेत, तर उर्वरित पोलिस ठाण्यांना देण्यात आले आहेत. अनेकदा यंत्राला मोबाईल सिमकार्ड कनेक्टिव्हीटी न मिळाल्याने वाहन चालकांना कारवाईची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत थांबावे लागते. या ‘ई चलन’ यंत्र पद्धत वाहतूक पोलिसांवरील होणारे भ्रष्टाचाराचे आरोप कमी होण्यास मदत झाली आहे. या ‘ई चलन’ पद्धतीमुळे एखाद्याविरुद्ध वारंवार कारवाई झाल्यास प्रत्येकवेळी या दंडाच्या रक्कमेत वाढ केली जाते.

राज्यातील शहरामध्ये मोबाईल कनेक्टिव्हीटी असली तरी या यंत्रामध्ये चालक परवाना चीप असलेले कार्ड त्यामध्ये घातल्यानंतर माहिती उपलब्ध होण्यास उशीर होतो. त्या कार्डमधील माहिती उपलब्ध होत असल्याने चालकाच्या परवान्याची माहिती, विमा तसेच त्याने प्रदूषणमुक्त प्रमाणपत्र (पीयूसी) घेतले आहे की नाही याची माहिती कळते. त्यामुळे हेल्मेट नसल्याने कारवाई करताना परवाना चालक कार्डमध्ये नोंद असलेली माहितीत विमा किंवा प्रदूषणमुक्त प्रमाणपत्र नसल्यास त्यासंदर्भात कारवाई केली जाते, असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

या ‘ई चलन’ यंत्राद्वारे कोणत्याही प्रकारचे पेमेंट कार्डद्वारे स्वीकारले जाते. मात्र, ते जर एखाद्याकडे नसल्यास रोख रक्कमही स्वीकारण्याचीसोय आहे. त्यामुळे वाहन चालकांना पर्यायी सेवा ठेवण्यात आल्या आहेत.

पोलिस, वाहनचालकांना भुर्दंड

अनेकदा ‘ई चलन’वरून डेटा डाऊनलोड करताना उशीर होतो तेव्हा वाहन चालक संताप व्यक्त करतात. त्यांचा वेळ वाया जात असल्याने ते लेखी चलन देण्याचीही विनंती करतात. मात्र ही यंत्रे असलेल्या पोलिसांकडे पर्यायी ‘चलन बुक’ नसते. त्यामुळे पोलिसांना या चालकांचा संताप गुपचूप सहन करावा लागतो. ही सेवा येत्या काही दिवसांत तत्पर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. कर्मचाऱ्यांना ही यंत्रे हाताळताना वेळ जातो कारण त्यामध्ये काही डेटा लोड करताना बारीकसुद्धा चूक झाली तर पुन्हा सर्व प्रक्रिया करण्याची पाळी येते व त्यावेळी कनेक्टिव्हीची समस्या उद्‍भवण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे या अधिकाऱ्याने माहिती दिली.

 

संबंधित बातम्या