कोरोना व्‍हायरसशीसंबंधित पहिला संशयित रूग्‍ण सापडला

Dainik Gomantak
मंगळवार, 28 जानेवारी 2020

पणजी, चीनमध्ये साथ फैलावलेल्‍या ‘कोरोना’ व्‍हायरसबाबत (ज्याला वुहान वायरसही म्हटले जाते) संशयित पहिला रूग्‍ण गोव्‍यात सापडला आहे. हा रूग्‍ण त्‍याच्‍या पत्‍नीसोबत चीनहून गोव्‍याला आला आहे. चीनमधील वुहान गावापासून त्‍याचे वास्‍तव्‍य सुमारे ७५० किमी दूर होते. त्‍याच्‍यात कोरोनाबाधीतपणाची लक्षणे असल्‍याने गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी विशेष विभागात त्‍याला ठेवले आहे. या रूग्‍णाचे रक्‍त, थुंकी इ. गोष्‍टी पुणे येथे एनआयव्‍हि प्रयोगशाळेत पाठविले आहेत. हा केवळ संशयित रूग्‍ण असून आमच्‍यामते हा कोरोनाशी ग्रस्‍त नसावा. नागरिकांनी घाबरून जाण्‍याचे कारण नसल्‍याची माहिती गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक शिवानंद बांदेकर यांनी दिली.
मंगळवारी सायंकाळी गोवा आरोग्‍य खात्‍यातील सभागृहात पत्रकारपरिषद घेउन हि माहिती देण्‍यात आली. यावेळी आरोग्‍य सचिव संजय कुमार, संचालक डॉ. जोस डिसा, साथीचे रोग नियंत्रण विभागप्रमुख डॉ. उत्‍कर्ष बेतोडकर उपस्‍थित होते.
संबंधित जोडपे हे चीनमधून दिल्‍ली आणि तेथून मुंबई मग गोवा असा प्रवास करीत आले आहे. त्‍यांनी विविध जागा फिरल्‍या असल्‍याने त्‍यांना सर्दी, पडसेचा त्रास अधिक प्रमाणात होत असावा. देशभरात अशा कित्‍येक संशयित रूग्‍णांची नोंद झाली असली तरी त्‍यातून एकही रूग्‍ण बाधित नसल्‍याचे सिध्‍द झाले आहे. या व्‍यक्‍तीच्‍या बायकोलाही थोडी सर्दी जाणवत असल्‍याने तिचे रक्‍त, थुंकीही केवळ सतर्कता म्‍हणून पाठविली असल्‍याची माहिती यावेळी देण्‍यात आली.
गोमेकॉत ३० घाट आणि एक अतिदक्षता विभासह सतर्कता कोरोनागाग्रस्‍तांसाठी स्‍वतंत्र विभागाची रचना करण्‍यात आली आहे. असाच ७ खाटांचा विभाग विमानतळाजवळ चिखली येथेही आहे. राजधानी दिल्लीसह मुंबई, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, कोच्ची आणि कोलकातासह देशातील एकूण १५ विमानतळांवर थर्मल स्‍क्रिनिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. या विमानतळांच्‍या यादीत गोव्‍याचे नाव नसले तरी आम्‍ही केंद्रिय आरोग्‍य खात्‍याकडे सतर्कता म्‍हणून थर्मल स्‍क्रिनिंगची मागणी केली असल्‍याचे आरोग्‍य सचिव म्‍हणाले.
राज्‍यातील स्‍थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्‍यात यावे म्‍हणून विविध सरकारी खाती, पोलीस, सरकारी तसेच खासगी इस्‍पितळे आणि तज्ञ डॉक्‍टरांची मिळून एक समिती करण्‍यात आली आहे. विमानतळावरही आरोग्‍य कार्ड भरण्‍यात येत आहेत. तसेच राष्‍ट्रीय स्‍तरावर या हेतूने काम करणार्‍या विविध समित्‍यांच्‍या आम्‍ही संपर्कात आहोत. लोकांनी घाबरून न जाता सहकार्य करावे असे संचालकांनी सांगितले.

लक्षणे
डोकेदुखी, नाक गळणे, खोकला, घसा खवखवणे, ताप, अस्वस्थ वाटणे, शिंका येणे, धाप लागणे, थकवा जाणवणे, निमोनिया, फुफ्फुसात सूज यासारखी लक्षणं जाणविल्‍यास डॉक्‍टरांशी संपर्क साधावा, अस आवाहन करण्‍यात आले आहे. राज्‍यात चुकून कोरोनाबाधित रूग्‍ण आढळलाच तर उपचारासाठी व्‍यवस्‍था सज्‍ज करण्‍यात आल्‍याची माहिती यावेळी देण्‍यात आली.
 

 

संबंधित बातम्या