बगल रस्ता सौंदर्यीकरण प्रस्ताव

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

डिचोलीतील विकासकामे लवकरच मार्गी :राजेश पाटणेकर 

बगलमार्गाच्या सौंदर्यीकरण कामाची पायाभरणी

रस्ता सौंदर्यीकरण कामाच्या कोनशिलेचे अनावरण करताना राजेश पाटणेकर. बाजूस सतिश गावकर, कुंदन फळारी, गुरुदत्त पळ, अजित बिर्जे, विजयकुमार नाटेकर, चैतन्या तेली, राम नाईक आणि मान्यवर.

डिचोली : डिचोली शहराचा विकास करणे हे आपले ध्येय असून, सरकारच्या सहकार्यातून विकास प्रक्रियेला आता गती मिळणार आहे. अत्याधुनिक बसस्थानकासह महत्त्वाच्या विकास प्रकल्पांना लवकरच चालना मिळणार असून, येत्या आठवडाभरात २० कोटींची विकासकामे मार्गी लागणार आहेत.

अशी ग्वाही डिचोलीचे आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर यांनी रविवारी (ता.१६) डिचोलीत बोलताना दिली. रस्ता सौंदर्यीकरण प्रस्तावाअंतर्गत श्री शांतादुर्गा विद्यालय ते कदंब बसस्थानकपर्यंतच्या बगलमार्गाच्या सौंदर्यीकरण कामाची पायाभरणी केल्यानंतर सभापती श्री. पाटणेकर बोलत होते. सुमारे एक कोटी ९ लाख रुपये खर्चून या बगलमार्गाचे रुंदीकरण आणि सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. सभापती पाटणेकर यांनी नारळ वाढवून कोनशिलेचे अनावरण केले.

यावेळी नगराध्यक्ष सतिश गावकर, उपनगराध्यक्ष कुंदन फळारी, नगरसेवक विजयकुमार नाटेकर, अजित बिर्जे, राम नाईक, गुरुदत्त पळ आणि चैतन्या तेली, भाजप मंडळाचे अध्यक्ष वल्लभ साळकर, कांता पाटणेकर, डॉ. कौस्तुभ पाटणेकर, विद्यावर्धक मंडळाचे अध्यक्ष विजय सरदेसाई, विस्मय प्रभुदेसाई, मुळगावची माजी सरपंच श्रुती घाटवळ, लाडफेची पंच मंदा च्यारी, सूर्यकांत देसाई, गुरुदास कडकडे, राजेश धोंड, अभिजीत तेली, पालिकेचे अधिकारी आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालिकेच्या विशेष निधीतून रस्त्यांचे सौंदर्यीकरण काम मार्गी लागले आहे. सौंदर्यीकरण झाल्यानंतर शहराच्या सौंदर्यात भर पडतानाच बगलमार्ग पार्किंगमुक्‍त होण्यास मदत होणार आहे. असे नगराध्यक्ष सतिश गावकर यांनी सांगून, सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्‍त केली.

बांधकाम खात्याच्या इमारतीचे उद्‌घाटन !
दरम्यान, ‌‌प्रतीक्षेत असलेल्या आणि सार्वजनिक बांधकाम खात्यासाठी बांधण्यात आलेल्या इमारत प्रकल्पाचे सकाळी १० वा. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्‌घाटन होणार आहे. यावेळी सभापती राजेश पाटणेकर, बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर, नगराध्यक्ष सतिश गावकर, उपनगराध्यक्ष कुंदन फळारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
 

संबंधित बातम्या