कोरोनाग्रस्त गोव्‍याचा कोरोनामुक्‍तीपर्यंतचा प्रवास

Dainik Gomantak
सोमवार, 20 एप्रिल 2020

एकामुळे त्‍याच्‍या भावालाही कोरोनाची लागण झाल्‍याची माहिती २९ मार्च रोजी उघड झाली. याच दिवशी आणखी एकाला कोरोनाची लागण झाल्‍याचे समजले ज्‍याने न्यूयॉर्क ते गोवा प्रवास केला होता. धोका वाढतच होता तशीच भीतीही वाढत होती.

तेजश्री कुंभार
पणजी,

राज्‍यातील कोरोनाग्रस्‍तांचा आकडा सातवरून शुन्यावर आला आहे. परंतु जर भुतकाळात पाहायचे झाले तर हा लढा प्रत्‍येक गोमंतकीयांच्‍या स्‍मरणात राहील असाच आहे. राज्‍यात २६ मार्च रोजी रात्री साडेबारा वाजना तीन कोरोनाबाधित रुग्‍ण सापडले असल्‍याची माहिती आरोग्‍य खात्‍याने दिली होती. तेव्‍हापर्यंत एकही रुग्‍ण सापडला नसल्‍याने लोक बिनधास्त होते, मात्र दुसऱ्‍या दिवशी वर्तमानपत्रात ही बातमी लोकांनी वाचली आणि त्‍यांच्‍यात धास्ती वाढली. लॉकडाऊनही कडक करण्‍यात आला. 
सुरवातीला कोरोना पॉझिटीव्ह तिघेही रुग्ण पुरुष होते आणि ते अनुक्रमे २५, २९ आणि ५५ वर्षांचे होते. त्‍यांनी स्पेन, ऑस्ट्रेलिया आणि युएस येथे प्रवास केला होता. त्‍यानंतर या तिघांच्‍या कुटुंबियांचे म्‍हणजे सुमारे १४ जणांचे विलगीकरण करण्‍यात आले. यातील एकामुळे त्‍याच्‍या भावालाही कोरोनाची लागण झाल्‍याची माहिती २९ मार्च रोजी उघड झाली. याच दिवशी आणखी एकाला कोरोनाची लागण झाल्‍याचे समजले ज्‍याने न्यूयॉर्क ते गोवा प्रवास केला होता. धोका वाढतच होता तशीच भीतीही वाढत होती. कारण आता राज्‍यात कोरोनाग्रस्‍तांचा आकडा ५ झाला होता. त्‍यानंतर २ एप्रिल रोजी पाचपैकी दोघा रुग्‍णांची प्राथमिक कोरोना पडताळणी चाचणी निगेटिव्‍ह आली आणि पुढील ४८ तासांत जर त्‍यांची चाचणी निगेटिव्‍ह आली, तर दोघे कोरोनामुक्‍त होणार असल्‍याची माहिती आरोग्‍य खात्‍याने दिली. मात्र, लगेच ३ एप्रिल रोजी आणखी दोन रुग्‍णांची त्यात भर पडली आणि बाकीच्‍या दोघांच्‍या चाचण्‍या पुन्‍हा पॉझिटिव्‍ह आल्‍या. आता संख्‍या सात झाली होती आणि नागरिकांत भीती वाढू लागली होती.
सातवरून शुन्‍यापर्यंत येणारा प्रवासही अशाचप्रकारे तारखांचे खेळ खेळणारा होता. लोकांना दिलासा इतकाच होता की संशयितांची संख्‍या वाढत होती. मात्र, कोरोनाग्रस्‍तांचा आकडा वाढत नव्‍हता. ८ एप्रिल रोजी एक रुग्‍ण बरा झाल्‍याची माहिती आरोग्‍यमंत्र्यांनी दिली आणि लोकांच्‍या जीवात जीव आला. त्‍यानंतर ११ एप्रिल रोजी एकदम ४ रुग्‍ण बरे झाल्‍याचे सांगत राज्‍यात आता केवळ दोन कोरोनाग्रस्‍त रुग्‍ण असल्‍याची माहिती देण्‍यात आली. १५ एप्रिल रोजी एक आणि आज १९ एप्रिल रोजी एक रुग्‍ण बरा झाल्‍याची माहिती देण्‍यात आली. आता राज्‍यातील कोरोनाग्रस्‍तांचा आकडा शून्‍य असला तरी काळजी घेणे आणि टाळेबंदीचे पालन करणे आवश्‍यक आहे. 

कोरोनाचे सापडलेले रुग्ण
तारीख        रुग्‍ण संख्‍या     
२६ मार्च                                       ३
२९ मार्च                                       २
३ एप्रिल                                       २

कोरानाचे बरे झालेले रुग्‍
तारीख      रुग्‍ण संख्‍या 
८ एप्रिल                                    १ 
११ एप्रिल                                  ४ 
१५ एप्रिल                                  १
१९ एप्रिल                                  १
 

संबंधित बातम्या