शेअर बाजारात यामुळे वाढली अस्वस्थतता

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

शेअर बाजारावर ‘कोरोना’चे सावट कायम

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ८२ अंशांच्या घसरणीसह ४० हजार २८१ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ३१ अंशांची घसरण होऊन ११ हजार ७९७ अंशांवर बंद झाला.

मुंबई : शेअर बाजारावर कोरोना विषाणूचे सावट कायम असून, बाजारात मंगळवारी दिवसभर अस्थिरतेचे वातावरण होते.

कोरोना विषाणूचा प्रसार चीनबाहेर होत असल्याने आशियातील गुंतवणूकदारांनी धसका घेतला आहे. तसेच, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यात गुंतवणुकीबाबत मोठे निर्णय होऊन अर्थव्यवस्थेला उभारी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ट्रम्प-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीतून अपेक्षित सकारात्मक बातमी न आल्याने गुंतवणूकदारांची निराशा झाली आहे.

याचबरोबर "फायनान्शियल ऍक्‍शन टास्क फोर्स'ने (एफएटीएफ) मॉरिशसला देखील "ग्रे लिस्ट'मध्ये टाकल्यामुळे मुंबई शेअर बाजारात सकाळी जोरदार घसरण झाली. शेअर बाजारात आज मोठ्या प्रमाणात अस्थिरतेचे वातावरण दिसून आले. अखेर निर्देशांक मागील सत्राच्या तुलनेत ८२ अंशांच्या घसरणीसह ४० हजार २८१ अंशांवर बंद झाला.

सन फार्माला सर्वाधिक फटका
आजच्या सत्रात सेन्सेक्‍सच्या मंचावर सन फार्माच्या समभागामध्ये सर्वाधिक २.३७ टक्‍क्‍यांची घसरण झाली. त्यापाठापोठ एचसीएल टेक, रिलायन्स इंडस्ट्रीज, इंड्‌सइंड बॅंक, बजाज ऑटो, टायटन आणि एल अँड टीच्या समभागामध्ये घसरण झाली. दुसरीकडे टीसीएसचा समभाग १.९८ टक्‍क्‍यांनी वधारून बंद झाला. तसेच, टाटा स्टील, एसबीआय, भारती एअरटेल, एशियन पेंट्‌स, नेस्ले या कंपन्यांचे समभाग सकारात्मक पातळीवर बंद झाले.

 

संबंधित बातम्या