गटाराच्या पाण्याच्या मार्ग सुरळीत करण्यासाठी नगरसेवकांचा विरोध

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

मळ्यातील दुसऱ्या पुलावरून वाहतूक नको
गटारातील पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था न केल्याने नगरसेवकांचा विरोध

पणजी : मळ्यातील रुअ दी ओरें खाडीवर उभारलेलेल्या पुलाचा दुसरा मार्ग जवळपास बांधून तयार होत आला आहे. परंतु हा मार्ग बांधताना येथील गटारातील पाण्याची व्यवस्था अद्याप व्यवस्थित न केल्याने तो मार्ग वाहतुकीस सुरू करण्यास स्थानिक नगरसेवकांनी विरोध दर्शविला आहे.
सांताक्रूझ, ताळगाव आणि मळ्यातून बसस्थानकाकडे जाणाऱ्या वाहनांच्या सोयीसाठी पाटोमार्गे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या काळात पुलाची निर्मिती सुरू झाली.

त्यांच्या काळात या पुलाचा एक भाग वाहतुकीस खुला झाला. परंतु दुसऱ्या भागाचे काम अद्याप हळू हळू सुरू आहे. काही टक्के काम बाकी राहिले असले, तरी हा मार्ग तयार करताना गटारे बुजवल्याने पेट्रोल पंपाजवळ आणि त्याच्या विरुद्ध बाजूला असलेल्या गटारात घाण पाणी साचून राहत आहे. त्यामुळे या पाण्याला अगोदर मार्ग खुला करावा, अशी मागणी नगरसेवकांची आहे. सांडपाणी सोडल्याच्या तक्रारी वाढल्याने मागील काही आठवड्यांपूर्वी आमदार बाबूश मोन्सेरात यांनी विविध खात्याच्या अधिकाऱ्यांना बोलावून या भागाची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना गटार व्यवस्थेवर तत्काळ मार्ग काढण्याच्या सूचनाही केल्या होत्या.

मळ्यातील दुपदरी मार्गावरून वाहतूक सुरू झाल्यास एक जाणारा आणि एक येणारा मार्ग राहणार आहे. एक मार्ग सुरू झाल्याने पाटो येथील जुन्या पुलावरून होणारी वाहतूक मोठ्याप्रमाणावर या पुलामुळे कमी झाली आहे. दुसराही मार्ग सुरू झाल्यानंतर जुन्या पुलाकडून शहरात आणि शाळेत व दिवजा सर्कलच्या बाजूला जाणारीच वाहने मार्गक्रमण करतील. परंतु त्यासाठी गटार व्यवस्था अगोदर सुरळीत करून मगच पूल वाहतुकीस खुला करावा, अशी मागणी या परिसराती नगरसेवकांनी अनेक सर्वसाधारण सभांतून केली आहे. शिवाय आताही या परिसरातील नगरसेवक याच मतावर ठाम आहेत.

गटाराच्या पाण्याच्या मार्ग
सुरळीत करण्याची सूचना

माजी महापौर आणि नगरसेवक शुभम चोडणकर यांनी सांगितले की, आमदारांनी केलेल्या पाहणीवेळी पुलाच्या दुसऱ्या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यापूर्वी गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळ, जलस्रोत खाते आणि सार्वजनिक बांधकाम खात्याला अगोदर गटाराच्या पाण्याचे मार्ग सुरळीत करा, असे स्पष्ट सांगितले आहे. आपलीही तीच मागणी असून गटारातील पाण्याचा प्रवाह सुरळीत झाल्यानंतरच वाहतूक करण्याची मागणी आपण वारंवार लावून धरली आहे.

संबंधित बातम्या