महिलांनी स्वतःची ओळख करून घेतली तर आपला शोध लागेल

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 1 मार्च 2020

महिलांकडे प्रचंड सृजनशक्ती : डॉ. किन्हाळकर

स्त्री संगम महिला मराठी संमेलनात अंतर्मुख करणारे विवेचन

संस्कृती भवन येथे गोवा मराठी अकादमीच्या ‘स्त्री संगम’ संमेलनात बोलताना डॉ. वृषाली किन्हाळकर. बाजुला अशोक नाईक तुयेकर, पौर्णिमा केरकर, दीपाली नाईक व अनिल सामंत.

संस्कृती भवन येथे गोवा मराठी अकादमीच्या ‘स्त्री संगम’ संमेलनाला उपस्थित महिला.

पणजी ः पासष्ठ-सत्तरमधील बाई अगतिक होती; परंतु आशादायी होती. बाईचे दिसण्यापेक्षा असणे महत्त्वाचे आहे. महिलांनी असण्याला महत्त्व दिलं पाहिजे. साहित्यातील स्त्री दुःखाचा आशय कालबाह्य झाला पाहिजे. महिलांनी स्वतःची ओळख करून घेतली तर आपला शोध लागेल.

बाईचे वस्तूकरण केले जात आहे. तेव्हा सावध होवून जगलं पाहिजे, याकडे लक्ष वेधून प्रसूतिशास्त्र व स्त्रीरोग तज्ज्ञ तथा साहित्यिका डॉ. वृषाली किन्हाळकर यांनी केवळ मुलं जन्माला घालणारं यंत्र हीच बाईची ओळख आहे का? असा प्रश्‍न उपस्थित करून गर्भाशयापलिकडे बाई काहीतरी आहे हे गीता, बायबल, कुराण, ज्ञानेश्‍वरी होऊन मनात ठसलं तेव्हा मी त्या अंगाने शोध घेण्याचा प्रयत्न केला. बाईकडे प्रचंड सृजनशक्ती आहे, मात्र स्त्रीत्त्वाचे भांडवल करत ‘मार्केटींग’ चालले आहे याची जाणीव करून दिली.

गोवा मराठी अकादमीतर्फे स्त्री संगम महिला मराठी संमेलन संस्कृती भवन, पणजी येथे पार पडले. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. वृषाली किन्हाळकर बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सामंत, सदस्य सचिव दिपाली नाईक, उपाध्यक्ष अशोक नाईक ‘पुष्पाग्रज’ व कार्यकारिणी सदस्य तथा संमेलनाच्या समन्वयक पौर्णिमा केरकर उपस्थित होत्या.
माझ्याकडे प्रसुती अवस्थेत बाई येथे तेव्हा ती वेदनेने तडफडत असते. बाहेर चेहरे मुलगा झाला की मुलगी हे ऐकण्यासाठी उत्सुक असतात. मुलगा झाला असे कळले, की चेहरे आनंदाने फुलतात.

मुलगी झाली हे ऐकायला उत्सुकता नसते. मुलगा झाल्याचे ऐकल्यानंतर डॉक्टरला देवपणसुद्धा दिले जाते. मात्र, मुलाला जन्म देताना तडफडणारी आई सुखरुप आहे ना? असे दुर्दैवाने विचारले जात नाही या घडनेकडे लक्ष वेधून डॉ. किन्हाळकर यांनी ‘वंशाचा दिवा’ ही कल्पना किती पोकळ आहे हे सोदाहरण स्पष्ट केले.

पुरुषांच्या चांगल्या गोष्टी घेऊन त्यांच्या बरोबरीने महिलांनी चालले पाहिजे. स्त्री जन्माचा आदर केला पाहिजे, स्वतःचे जगणे समृद्ध केले पाहिजे, असे स्पष्ट करून डॉ. किन्हाळकर म्हणाल्या, स्त्रियांनी संघर्ष केला पाहिजे. मुक्ताबाई, जनाबाई यांनी त्या काळात बंडखोरी केली हे केवढे धाडस होते.
प्राचार्य सामंत यांनी सांगितले, की या संमेलनातून सकारात्मक सूर घेऊन महिला जातील तेव्हा संमेलनाचे सार्थक होईल. डॉ. किन्हाळकर यांनी आपल्या विचारांनी सर्वांना अंतर्मुख केले आहे. या विचारांचे महिलांनी चिंतन करावे व स्वतःला समृद्ध करण्याचा प्रयत्न करावा.

उद्‌घाटन सत्रात पौर्णिमा केरकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. विनोदी केरकर व अनिता केरकर यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. डॉ. गीता गावस येर्लेकर यांनी सूत्रसंचालन केले तर पुष्पाग्रज यांनी आभार मानले.

दुसऱ्या सत्रात ‘त्यांची झेप त्यांचे आकाश’ हा विविध क्षेत्रात कार्य केलेल्या महिलांशी संवाद साधणारा कार्यक्रम झाला. संवादिका म्हणून सिद्धी उपाध्ये यांनी काम पाहिले यात सुलक्षणा सावंत (राजकारण-समाजकारण), संगीता अभ्यंकर (निवेदन, कविता लेखन, साहित्य चळवळ), उषा नार्वेकर (शासकीय अधिकारी व क्रीडा नैपुण्य), पिरोज नाईक (शिक्षिका व लोककलाकार) व देवकी नाईक (कला) यांचा समावेश होता.

सुलक्षणा सावंत म्हणाल्या, लग्नानंतर सासरी गेल्यानंतर राजकारण, समाजकारणाशी संबंध आला सामाजिक बांधिलकी मानून काहीतरी करण्यास समाधान असते. मी विज्ञान शाखेतील पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतले ते आई वडिलांच्या पाठिंब्याने. महिलांनी राजकारणात उतरायची आज खूप गरज आहे.

संगीता अभ्यंकर म्हणाल्या, मी कुठलीही गोष्ट ठरवून केलेली नाही. आनंदाने जगणे व दुसऱ्याला आनंदाने जगायला देणे हे माझे पहिले ध्येय आहे. मी अनुभूती घेत जगते. अमुक एक प्रतिमा घेऊन जगण्यात दडपण येते. कर्णबधीर मुलांसाठी स्वरनाद शाळा काढण्यामागची पार्श्वभूमी व त्यातून मुलांना झालेला फायदा याबद्दलही त्यांनी सांगितले.

नेमबाजीत आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळविलेल्या उषा नार्वेकर यांनी, लहानपणी देवळासमोरील व मैदानावर खेळता खेळता इथपर्यंत कशी पोहचले याची प्रेरणादायी कथा सांगितली. नवऱ्याच्या प्रोत्साहनामुळे आत्मविश्‍वाच्या जोरावर आपण हे यश प्राप्त केल्याचे त्यांनी नमूद केले.
पिरोज नाईक यांनी सांगितले की, माझा शिक्षकी पेशा; परंतु लोककला रक्तात भिनली आहे. आपल्या रुढी, परंपरा, संस्कृती लोकगीतांमध्ये समाविष्ट आहे. म्हणूनच धालोगीतांवर वनदेवतेच्या प्रांगणात हे पुस्तक मी लिहिले. आज धालो खेळायला बयकांना लाज वाटते. परंतु मी आजही धालांच्या मांडावर पाच दिवस रमते.

देवकी नाईक म्हणाल्या, मी एम.ए.पर्यंत शिक्षण घेतले; परंतु नोकरीकडे वळले नाही. बालपण कुळागारात गेल्याने निसर्गाशी नाळ जोडली होती. कॉलेजमध्ये असतानापासून बेस्ट ऑप वेस्ट करायची. आकाशकंदील करायला नवऱ्याला मदत करायची हळूहळू आकाशकंदील नवनव्या पद्धतीने करायची ओढ लागली आणि अनेक प्रयोग करून पर्यावरणपूरक आकाशकंदील बनवले. प्रथम बक्षीसही मिळाले आणि महिलांना आकाशकंदील करायला शिकवायची कार्यशाळा पण घेण्यास मला प्रवृत्त केले गेले. कार्यशाळेत लहान मुलींपासून साठ-सत्तर वर्षांच्या बायकासुद्धा सहभागी झाल्या व त्या खुष झाल्या. मला दुवाही मिळाला.

दुपारच्या सत्रात ‘सखे ग सये’ हा विविध गुणदर्शनात्मक कार्यक्रम करून तरुणींनी दाद घेतली. त्यानंतर डॉ. वृषाली किन्हाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कवि संमेलनात गिरीजा मुरगोडी, अंजली आमोणकर, चित्रा शिरसागर, दीपा मिरींगकर, अपूर्वा ग्रामोपाध्ये, डॉ. नीता तोरणे, अंजली चितळे, गौरी कुलकर्णी, रेखा पौडवाल, गौतमी गावस, बबिता गावस, स्नेहा जोशी, कालिका बापट, सविता गिरोडकर, अनुराधा म्हाळशेकर, कविता आमोणकर या कवयित्रींचा समावेश होता.

आपली भाषा हा संस्कृतीचा ठेवा
सगळ्या भाषांचा मान राखा; परंतु ‘आईचं’ (मराठीचे) प्रेम कमी होता कामा नये. मराठी भाषा जपायला हवी. इंग्रजी बोलणाऱ्या विद्वान समजणाऱ्यांचे कारण नाही. विद्वान आणि भाषेचा संबंध नसतो. भाषेवर विद्वत्ता अवलंबून नसते. आपली भाषा हा संस्कृतीचा ठेवा आहे, असे डॉ. किन्हाळकर यांनी सांगितले.

उडू पहाणाऱ्या मुलींचे पंख छाटू नका
लग्नानंतर शिकलेल्या मुलीला नोकरी करायला बंधन घातल्यामुळे तिचे लग्न मोडत असेल तर तिला दोष देऊ नका. घटस्फोटीत मुलींनी लग्न केलं तर तिला मामाने जगू द्या. तरुण मुली मर्यादेबाहेर काही करत असतील चार शब्द सुनवा, परंतु त्यांना त्यांच्यापरीने थोडं स्वातंत्र्य द्यायचे असेल, उंच भरारी घ्यायची असेल तर त्यांचे पंख छाटू नका. महिलांचा कण्हण्याचा कवितेतील सूर तसाच रहाता कामा नये, असे डॉ. किन्हाळकर यांनी समारोप सत्रात आवाहन केले.
 

संबंधित बातम्या