क्रिकेटपटू वैभवची दुखापत, वजनवाढीवर मात

Dainik Gomantak
मंगळवार, 21 एप्रिल 2020

क्रिकेटपटू वैभवची दुखापत, वजनवाढीवर मात

किशोर पेटकर
पणजी,

रणजी क्रिकेट मोसम संपत असताना दुखापतीने डोके वर काढले, तसेच वजनही वाढल्यामुळे गोव्याचा युवा क्रिकेटपटू वैभव गोवेकर चिंतित होता, त्याच्या कारकिर्दीसाठी या बाबी हानीकारकच होत्या. मात्र या २२ वर्षीय डावखुऱ्या फलंदाजासाठी लॉकडाऊन तंदुरुस्तीच्या दृष्टीने लाभदायक ठरले. दुखापत, तसेच वजनवाढीवर मात करण्यात तो सफल ठरला.
वैभवने लॉकडाऊनमध्ये फिटनेस, रिहॅबबरोबरच हार्मोनियम वादन, तसेच पाककृतीसही प्राधान्य दिले. शैलीदार फलंदाज असलेला वैभव रुचकर, स्वादिष्ट जेवण बनवणारा बल्लवही आहे.
‘‘मार्चच्या सुरवातीस गुजरातविरुद्ध रणजी करंडक उपांत्यपूर्व लढतीत घोट्याची दुखापत समोर आली. याशिवाय खांदाही तक्रार करत होता. त्यामुळे मी प्रीमियर लीग स्पर्धेसाठीही अनुपलब्धता कळविली होती. लॉकडाऊनच्या कालावधीत सक्तीने घरीच राहावे लागल्यामुळे गोवा क्रिकेट असोसिएशनच्या फिजिओने दिलेला तंदुरुस्तीविषयक आणि आहारविषयक कार्यक्रम कटाक्षाने पाळणे शक्य झाले. जीसीएचे क्रिकेट प्रशिक्षण संचालक प्रकाश मयेकर यांच्या संपर्कात राहिलो, त्यांच्या सूचनाही महत्त्वपूर्ण ठरल्या. समाधानाची बाब म्हणजे, आता घोटा आणि खांद्याच्या दुखापतीतून मी सावरलो आहे, वजन ७६ किलोवरून ६९ किलोंवर आणले आहे,’’ असे वैभवने सांगितले. मोसमाच्या सुरवातीस गेल्यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये डेहराडून येथे झालेल्या २३ वर्षांखालील एकदिवसीय स्पर्धेत दोन सामने खेळल्यानंतर त्याच्या डावाच्या हाताच्या अंगठ्याला चेंडू लागला होता. त्या दुखापतीवर मात करून त्याने जानेवारीत रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत पदार्पण केले होते.
म्हापसा येथील सेंट झेवियर्स महाविद्यालयात ‘एम.कॉम’च्या पहिल्या वर्षांचा विद्यार्थी असलेला वैभव सुकूर-बार्देश येथे एकटाच राहतो. त्याचे आई-वडील बेळगावला स्थायिक आहेत. क्रिकेटमुळे वैभवने गोव्यातच राहण्याचे ठरविले. तो चांगला हार्मोनियम वादक आहे. शिवाय उत्तम स्वयंपाकीही आहे. ‘‘लॉकडाऊन काळात कुठे बाहेर जाणे नसल्याने घरी एकटाच असतो. परीक्षाही लांबल्या, त्यामुळे माझ्यापाशी वेळ भरपूर होता. सकाळच्या सत्रात दुखापतविषयक रिहॅब, संध्याकाळी सुमारे दोन तास व्यायामविषयक सत्र केल्यानंतर उपलब्ध वेळेत मी हार्मोनियम वादनाचा आनंद लुटला, शिवाय पाककृतीचे वेगवेगळे प्रकारही शिकता आले,’’ असे वैभवने नमूद केले.

लक्षवेधक पदार्पण
डावखुऱ्या वैभवने २०१९-२० मोसमात गोव्याच्या रणजी करंडक क्रिकेट संघात पदार्पण केले. ३-५ जानेवारी २०२० या कालावधीत पर्वरी येथे झालेल्या मणिपूरविरुद्धच्या रणजी सामन्यात तो पहिल्यांदा खेळला. पदार्पणातील डावात त्याने ८८ धावा केल्या. त्यानंतर पर्वरी येथेच पहिले रणजी क्रिकेट शतक झळकाविताना अरुणाचल प्रदेशविरुद्ध १६० धावा केल्या. नंतर सोविमा येथे नागालँडविरुद्ध ७१ धावांची खेळी केली. पहिलाच रणजी करंडक क्रिकेट मोसम लक्षवेधक ठरविताना त्याने ५ सामन्यांतील ७ डावात ५०.८५च्या सरासरीने ३५६ धावा केल्या, यामध्ये १ शतक व २ अर्धशतकांचा समावेश आहे.

‘‘लॉकडाऊननंतर परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर लगेच मी क्रिकेटचा सराव सुरू करणार आहे. तंदुरुस्ती मिळविल्यानंतर नेट सरावासाठी मी आतूर आहे.’’
- वैभव गोवेकर
गोव्याचा युवा रणजी क्रिकेटपटू
 

संबंधित बातम्या