गोव्यातील क्रिकेटपटूंच्या तंदुरुस्तीचे मोठे आव्हान

Dainik Gomantak
रविवार, 19 एप्रिल 2020

गोवा क्रिकेट असोसिएशनचे (जीसीए) क्रिकेट प्रशिक्षण संचालक प्रकाश मयेकर यांच्या पुढाकारामुळे रणजी, वयोगट मुलगे, महिला क्रिकेट संघातील सर्व खेळाडूंसाठी ऑनलाईन तंदुरुस्ती शिबिराचा आगळा प्रयोग सुरू झाला आहे, त्याचे स्वागत होत आहे.

पणजी,

कोरोना विषाणू महामारी लॉकडाऊनमुळे क्रिकेटपटूंच्या तंदुरुस्तीवर परिणाम होण्याची शक्यता असून गोवा क्रिकेट असोसिएशन राज्यातील खेळाडूंना सक्रिय राखण्यासाठी आपल्यापरीने प्रयत्न करत आहे, पण आव्हान मोठे आहे.

गोवा क्रिकेट असोसिएशनचे (जीसीए) क्रिकेट प्रशिक्षण संचालक प्रकाश मयेकर यांच्या पुढाकारामुळे रणजी, वयोगट मुलगे, महिला क्रिकेट संघातील सर्व खेळाडूंसाठी ऑनलाईन तंदुरुस्ती शिबिराचा आगळा प्रयोग सुरू झाला आहे, त्याचे स्वागत होत आहे. मयेकर यांच्यानुसार, प्रक्रियेस खेळाडूंकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

ऑनलाईन तंदुरुस्ती शिबिरानंतरही खेळाडूंना स्वतःला तंदुरुस्त राखण्याचे आव्हान पेलावे लागेल. कारण – रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत गोव्यासाठी २०२०-२१ मोसम खूपच खडतर असेल. गोवा पुन्हा एलिट क गटात खेळणार आहे. जीसीएलाही खेळाडूंच्या पुढील मोसमाचे नियोजन करावे लागेल, सध्या तरी गोव्यातील मैदानावरील आणि प्रशासकीय क्रिकेट लॉकडाऊनमुळे बंदिस्त आणि ठप्प आहे.

जीसीएच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यानुसार, पुढील मोसमात गोवा रणजी स्पर्धेच्या एलिट क गटात खेळणार आहे. या गटातील संघ मातब्बर आहेत, त्यामुळे संघ बांधणीची तयारी आतापासून व्हायला हवी. जीसीएच्या व्यवस्थापकीय समितीने पुढील मोसमासाठी प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ यांची लगेच नियुक्ती केल्यास तयारी योग्य दिशेने राहील. लॉकडाऊनमधून बाहेर आल्यानंतर क्रिकेट सक्रिय करण्यासाठी परिणामकारक उपाययोजना हवी.

``क्रिकेटपटूंनाही जबाबदारीची जाणीव हवी. सारे काही गोवा क्रिकेट संघटनाच करेल आणि आम्ही फक्त घरी बसून राहायचे ही वृत्ती क्रिकेटपटूंना दूर ठेवावी लागेल आणि घरी असले, तरी फिटनेस आणि मेहनतीस विसरू नये,`` अशी सूचना जीसीएच्या अनुभवी ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने खेळाडूंना केली आहे. जीसीएच्या व्यवस्थापकीय समितीने क्रिकेटपटूंचा पाठपुरावा ठेवून, ते तंदुरुस्तीबाबत किती गंभीर आहेत याकडे लक्ष ठेवायला हवे, असे त्यांनी सुचविले.

काही क्रिकेटपटू संघात निवड व्हावी यासाठी दुखापती लपवतात, नंतर भलतीच कारणे देऊन सामना खेळण्याचे टाळतात, असे एका क्रिकेट प्रशिक्षकाने खेळाडूंच्या वृत्तीवर टीका करताना सांगितले. पुढील मोसम खडतर असल्यामुळे रणजी संघासाठी खेळाडूंची पूर्ण तंदुरुस्ती निर्णायक असेल, असे हा प्रशिक्षक म्हणाला.

 

अमोघच्या रिहॅबकडे लक्ष

गोव्याचा हुकमी अष्टपैलू अमोघ देसाई याला दुखापत आणि खांद्याच्या शस्त्रक्रियेमुळे २०१९-२० मोसमातील रणजी क्रिकेट स्पर्धेत एकही सामना खेळता आला नव्हता. त्याने अजून पूर्ण तंदुरुस्ती मिळविलेली नाही आणि आम्ही त्याच्या रिहॅबकडे (पुनर्वसन कार्यक्रम) लक्ष ठेवून आहोत, असे प्रकाश मयेकर यांनी सांगितले. अमोघ सलामीचा फलंदाज आहे, तसेच गरजेनुसार फिरकी-मध्यमगी गोलंदाजी टाकू शकतो. गतवर्षी ऑक्टोबरमध्ये विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत खेळल्यानंतर अमोघ दुखापतीमुळे क्रिकेट मैदानापासून दूरच आहे. तंदुरुस्ती मिळविल्यानंतरच त्याचा सराव अपेक्षित आहे. ऑनलाईन तंदुरुस्ती शिबिराच्या माध्यमातून गतमोसमात किरकोळ दुखापतीमुळे त्रस्त असलेल्या खेळाडूंनाही रिहॅब प्रक्रिया सुचविली असल्याचे मयेकर यांनी नमूद केले.

संबंधित बातम्या