शेतकरी बांधवांना योग्य तो मोबदला मिळणे आवश्यक : उपमुख्यमंत्री

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

राज्‍यात सेंद्रीय विद्यापीठ स्‍थापन करणार
उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांचे सूतोवाच : खोला येथे कृषी मेळावा

कृषी मेळाव्‍याचे उद्‍घाटन करताना उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर. बाजूला कृषी अधिकारी शिवराम नाईक गावकर, आगोंदचे सरपंच प्रमोद फळदेसाई

आगोंद : काणकोण तालुक्यात अनेक युवकांनी कृषी व्यवसायात आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. शेतकरीवर्गाच्या समस्या जाणून घेऊन व त्या सोडवण्यासाठी साधनसुविधा कृषी खात्यातर्फे मदत मिळवून देण्याचा आपला मानस आहे.

राज्यात ४१० कोटी रूपये खर्च करून सेंद्रीय विद्यापीठ स्थापन करण्यात येणार असल्याचे सूतोवाच उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी केले. खोला, काणकोण येथील खोला पंचायत सभागृहात आज पश्चिम घाट विकास योजनेंतर्गत कृषी संचालनालय गोवा, विभागीय कृषी खाते, काणकोण यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी मेळावा आयोजित करण्यात आला होता.

कृषी मेळाव्याच्या उद्‍घाटन समारंभाला उपमुख्यमंत्री तथा कृषीमंत्री चंद्रकांत कवळेकर प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. तसेच खोला जिल्हा पंचायत सदस्य शाणू वेळीप, आगोंद सरपंच प्रमोद फळदेसाई, श्रीस्थळ सरपंच गणेश गावकर, उपसरपंच बाबू उर्फ पंढरी प्रभूदेसाई, पंचसदस्य गुरू गावकर, गुरू वेळीप, फोंडू वेळीप, अजय पागी, काणकोणच्या सिडीपीओ आकांक्षा गावकर, कृषी खात्याच्या सहाय्यक संचालिका डेनिस आफांसो, पश्चिम घाट विकास योजनेचे संचालक श्रीराम धायमोडकर, माजी पंच नारायण वेळीप उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री कवळेकर म्‍हणाले की, शेतकरी बांधवांना योग्य तो मोबदला मिळणे आवश्यक असून त्यांना विश्वासात घेऊन, आधारभूत किमतीत वाढ करण्यात येणार आहे. शेतकरी आधार निधीतून नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना लवकरच मदत पोहचविली जाईल अशी ग्वाही मंत्री कवळेकर यांनी दिली.

जिल्हा पंचायत सदस्य शाणू वेळीप यांनी आजघडीला नारळासाठी गावातून पाडेली मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. सरपंच प्रमोद फळदेसाई, गणेश गावकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
कृषी मार्गदर्शक अजीत पै, प्रसाद वेळीप, सचिन नायक, गणेश गावकर, गौतम कामत व खोला मिर्ची संघटन प्रमुख रत्नाकर वेळीप यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कृषी अवजारे, विविध भाजी बियाणे खाद्य पदार्थ, प्रदर्शन व विक्री तसेच विविध बॅंकांच्या योजनांची माहिती देण्यासाठी स्टॉल उभारण्यात आले होते.

श्रीराम धायमोडकर यांनी स्वागत केले. माशे काणकोण येथील निराकार विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व स्वछता व पर्यावरण समतोल आधारीत पथनाट्य सादर केले.

कर्मचाऱ्यांच्या पैशांचा सरकारकडून अनावश्यक वापर

कृषी मेळाव्यात शेतकरी अजीत पै, खोतीगाव येथील ऊस व भाजी उत्पादक प्रसाद वेळीप, खोला येथील फुलशेती उत्पादक गौतम कामत, सचिन नायक, श्रीस्थळ येथील कृषी व्यवसायात विशेष रस असलेले श्रीस्थळ सरपंच गणेश गावकर व विभागीय कृषी अधिकारी शिवराम गावकर यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. आभार शिवराम गावकर यांनी मानले.

 

संबंधित बातम्या