पशुखाद्य दरवाढीच्या विरोधात आंदोलनाचा निर्णय

Dainik Gomantak
सोमवार, 20 जानेवारी 2020

फोंडा

फोंडा

गोवा डेअरीचे प्रशासक आणि दूध उत्पादक संस्थांच्या प्रतिनिधींमध्ये झालेली पशुखाद्य दरवाढ मागे घेण्याबाबतची चर्चा फिसकटल्याने आता गोवा डेअरीच्या गेटसमोर साखळी आंदोलन सुरू करण्याचा निर्णय दूध उत्पादकांनी घेतला आहे. आज (सोमवारी) सकाळी गोवा डेअरीसमोर जमलेल्या दूध उत्पादकांनी हा निर्णय घेतला.
दोन दिवसांपूर्वी पशुखाद्य दरवाढीवरून दूध उत्पादकांनी गोवा डेअरी इमारतीचे प्रवेशद्वार अडवून ठेवले होते. त्यावेळेला गोवा डेअरीचे प्रशासक नसल्याने याबाबत चर्चा झाली नव्हती. आज (सोमवारी) दूध उत्पादक गोवा डेअरीसमोर आल्यानंतर कुर्टी येथील सहकार भवन सभागृहात गोवा डेअरीचे प्रशासक अरविंद खुटकर व दूध उत्पादक संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. त्यात पशुखाद्य दरवाढ मागे घेण्याची मागणी दूध उत्पादकांकडून करण्यात आली.
या बैठकीत अरविंद खुटकर यांनी गोवा डेअरीच्या पशुखाद्य प्रकल्पासंबंधी माहिती देऊन दोन प्रस्ताव दूध उत्पादकांसमोर ठेवले. गोवा डेअरीचा पशुखाद्य प्रकल्प तोट्यात असल्याने महिन्याकाठी अठ्ठावन्न हजार रुपये तोटा होत आहे, त्यामुळेच ही दरवाढ करण्यात आली आहे. यासंबंधीचा निर्णय घेऊन तो मंजुरीसाठी सरकारकडे पाठवल्यावर त्याला सरकारकडून मान्यता देण्यात आली. त्यामुळे गेल्या १६ तारखेपासून ही दरवाढ करण्यात आली आहे. या पशुखाद्याचे दर किलोमागे चार रुपयांनी वाढवण्यात आले आहेत.
दूध उत्पादकांनी पशुखाद्य प्रकल्प नुकसानीची जबाबदारी स्वीकारावी व बहुतांश दूध सोसायट्यांनी यासंबंधीचे निवेदन सरकारला द्यावे तसेच गेल्या वर्षी महापुरामुळे खावडीवर परिणाम झाला असून दरवाढ झाली आहे. त्यासाठी दूध उत्पादकांनी अर्थसाह्यासाठी एक निवेदन द्यावे व त्यानुसार सरकारकडून विशेष अनुदान घेऊन ते दूध उत्पादकांना देण्यासाठी आपण प्रयत्न करीन, असे प्रशासकानी सांगितले. सरकारकडून अनुदानाच्या रूपात मिळणारी रक्कम दूध उत्पादकांना देण्याचे आश्‍वासन यावेळी देण्यात आली. मात्र, दूध उत्पादकांनी एक तर पशुखाद्य दर कमी करा, किंवा दूध उत्पादकांना दूध दरामागे वाढ करा, अशी मागणी केली. त्यामुळे बोलणी फिसकटल्याने शेवटी दूध उत्पादकांनी साखळी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला. यावेळी दूध उत्पादक अनुप देसाई तसेच इतरांनी जोपर्यंत गोवा डेअरी पशुखाद्य दर कमी करीत नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच राहील असे सांगितले. संजू कुंकळ्येकर यांनी सांगितले की दोन दिवसांत अपेक्षित निर्णय न झाल्यास गोवा डेअरीला दूध न देता ते बाहेर दिले जाईल, असा इशारा दिला. यावेळी पोलिस फौजफाटा तैनात होता.
दरम्यान, गेल्या १७ रोजी गोवा डेअरीच्या प्रशासनाविरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी आंदोलन छेडल्यानंतर गोवा डेअरीचे सुमारे साठ कामगार आपली कामाची जागा सोडून प्रशासकीय संकुलामध्ये घुसले व त्यांनी धक्काबुक्की केली असल्याचा आरोप गोवा दूध संघाशी संबंधित शेतकरी व आंदोलकांनी केला आहे. हे गोवा डेअरीचे बहुतांश कर्मचारी मद्यपान करून आले होते, असा आरोपही यावेळी दूध उत्पादकांनी केला असून त्यासंबंधीचे एक निवेदन गोवा डेअरीच्या प्रशासकांना देण्यात आले आहे.

संबंधित बातम्या