सर्विस रोड वरील पुतळ्यांची मोडतोड  

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 20 जानेवारी 2020

पर्वरी:पर्वरीत सर्विस रोडवरील पुतळ्यांची मोडतोड

पर्वरी:पर्वरीत सर्विस रोडवरील पुतळ्यांची मोडतोड
गेल्या एक दोन वर्षापूर्वी येथील सर्विस रोडचे सुशोभिकरण करून रस्त्यालगत बसविण्यात आलेल्या पुतळ्यांची अज्ञातांनी मोडतोड केली असून संबंधित पंचायतीनेही दुर्लक्ष केले आहे.त्‍यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.पर्वरी येथील पोलिस स्थानकापासून सुमारे दोनशे मीटर अंतरावर हा प्रकार घडला असल्याने लोक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.पर्वरीतील सर्विस रोड आणि बाजूचा वॉकिंग रोड आता अनेक अडचणींच्‍या विळख्‍यात सापडला आहे.भटके कुत्रे आणि पदपथावर वाढलेले गवत यामुळे या सर्विस रस्त्यावरून सकाळी वॉकिंग करणाऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.आझाद भवनाच्या मागील बाजूला पदपथाच्या बाजूची झुडपे अगदी या मार्गावर आली आहेत.त्या रस्‍त्‍यावरून चालणेही अशक्य झाले आहे.काही तरुण पथदीप फोडून टाकतात.काही पथदीपावरील बल्ब चोवीस तास पेटत असतात.याकडे संबंधित पंचायतीने लक्ष द्यायला पाहिजे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
पर्वरी या भागातून जाणारी वाढती रहदारी लक्षात घेता स्थानिक लोकांसाठी सर्विस रोडची नितांत गरज होती. यासाठी महसूल मंत्री रोहन खवटे यांच्या प्रयत्नांतून हा सर्विस रोड बांधण्यात आला होता. सर्विस रोडचे सुशोभीकरण करण्याच्या उद्देशाने समाजात वेगवेगळे पारंपरिक व्‍यवसाय करणाऱ्यांचे प्रतीक दर्शविणारे पुतळे ठिकठिकाणी बसविण्यात आले होते.यात कुंभार, कोळी, फुले विकणारी बाई, रेन्देर यांचा समावेश आहे. त्यासाठी हजारो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला होता.परंतु त्या पुतळ्यांची व्यवस्थित देखभाल न झाल्यामुळे काही विघ्नसंतोषी लोकांनी त्या पुतळ्यांची मोडतोड करण्यात सुरवात केली आहे.
सर्विस रोडवरील अनेक पुतळे देखभालीविना उभे आहेत.वाढत्या वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी सर्विस रोडची संकल्पना पुढे आली होती.या अतिरिक्त मार्गामुळे येथील रहिवाशांची वाहतूक समस्या सुटण्यास मदत झाली आहे. परंतु कालांतराने देखभालीच्या अभावामुळे पूर्णपणे दुर्लक्ष होत गेले आहे.सध्या या सर्विस रोडवरून महामार्गावरील अनेक वाहने वाहतूक पोलिसांना चुकविण्यासाठी किंवा अन्य कारणासाठी या रस्त्यावरुन वेगाने जातात. त्याकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष द्यायला पाहिजे, अशी मागणी भाजपचे मंडळ सचिव अशोक शेट्टी यांनी केली आहे.

वेल्डर्सची कमतरता

संबंधित बातम्या