सांगेत सरकारी कार्यालयांना उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

सांगे:उपजिल्हाधिकारी अजय गावडे यांनी सरकारी कार्यालयांना भेट दिली त्यावेळी कार्यालयातील स्थिती.

सांगे:उपजिल्हाधिकारी अजय गावडे यांनी सरकारी कार्यालयांना भेट दिली त्यावेळी कार्यालयातील स्थिती.

पन्नास टक्केच अधिकारी, कर्मचारी वेळेवर उपस्थित
सांगेतील सरकारी कार्यालयात शिस्त यावी, यासाठी सांगेचे उपजिल्हाधिकारी अजय गावडे यांनी आज सकाळी अचानक सांगेतील सर्व सरकारी कार्यालयांना भेटी देऊन सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांची हजेरी तपासली असता सकाळी ९.५० पर्यंत अकरा कार्यालयात पन्नास टक्के उपस्थिती आढळली, तर अकरा पैकी आठ कार्यालयातील प्रमुख अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याचे आढळून आले असून उपजिल्हाधिकारी अजय गावडे यांनी घेतलेल्या कडक पावित्र्यामुळे सरकारी कर्मचारी वर्गात एकाच धावपळ उडाली होती.
सकाळी पावणे दहा वाजता उपजिल्हाधिकारी अजय गावडे मामलेदार कॉम्पेलक्‍स मधील सार्वजनिक बांधकाम खाते, गटविकास कार्यालय, पशुचिकित्सा कार्यालय, नागरीपुरवठा खाते, मामलेदार कार्यालयांना प्रथम भेटी दिल्या असता कार्यालयीन प्रमुखासह बरेच कर्मचारी कामावर पोचले नसल्याचे दिसून आले.या कॉम्प्लेक्‍समध्ये मामलेदार मनोज कोरगावकर व संयुक्त मामलेदार अनारिता पायस वगळता एकही अधिकारी वेळेवर हजर नव्हता.

त्यानंतर अबकारी खाते कार्यालय, महिला आणि बाल विकास कार्यालय, भाग शिक्षणाधिकारी कार्यालय, सब रजिस्टर या कार्यालयांना भेटी दिल्या असता भागशिक्षणाधिकारी वेळेवर उपस्थित होते.इतर कार्यालयात कर्मचारी उपस्थिती कमी असली तरी अधिकारी कार्यालयात नसल्याने काहींनी साहेब आज दौऱ्यावर असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला, पण अधिकारी नुकतेच कामावर येत असल्याचे उपजिल्हाधिकाऱ्यांना दिसून आले.

कित्येक ठिकाणी कार्यालयातील मुव्हमेंट रजिस्टरवर कोणताही शेरा नसल्याचे आढळून आले.तर काही कार्यालयात बायोमेट्रिक मशीन नसल्याचे दिसून आले.तर काही ठिकाणी मशीन बिघडल्याचे उपजिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आले.पावणे दहा वाजता कार्यालयात लोक आपली कामे घेऊन हजर असल्याचे पाहणीत आले, पण आवश्‍यक कर्मचारी कार्यालयात हजर नव्हते.

या संदर्भात उपजिल्हाधिकारी अजय गावडे यांनी अचानक सरकारी कार्यालयांना भेटी देण्यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले, सरकारी कार्यालयाची वेळ सकाळी साडे नऊ ते संध्याकाळी पावणे सहा असा असताना नागरिकांकडून कार्यालयीन कामे वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या होत्या.त्यादृष्टीने आज बऱ्याच शासकीय कार्यालयांना अचानक भेटी दिल्या असता कर्मचाऱ्यांबरोबर अधिकारी वेळेवर कार्यालयात येत नसल्याचे आजच्या भेटीत आढळून आले.उशिरा येणाऱ्यांना ‘मेमो’ देण्याचा आदेश दिला असल्याचे उपजिल्हाधिकारी अजय गावडे यांनी सांगितले.

 

मोर्लेत रस्त्याच्या हॉट मिक्सिंगला प्रारंभ

संबंधित बातम्या