अर्थसंकल्‍प 2021: ‘अर्थसंकल्‍पीय अधिवेशन 20 दिवसांचे घ्‍या’

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 23 जानेवारी 2021

सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशन 20  दिवसांचे घ्यावे. त्याच अधिवेशनात चर्चा करून अर्थसंकल्प मंजूर करावा.

पणजी: सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशन 20 दिवसांचे घ्यावे. त्याच अधिवेशनात चर्चा करून अर्थसंकल्प मंजूर करावा. लेखानुदान घेऊ नये. कारण गेल्या वर्षी लेखानुदान घेतले, पण वर्षभरात जेमतेम आठ दिवसच विधानसभा कामकाज चालले होते, असे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत म्हणाले.

काँग्रेस भवनात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत मागील अधिवेशनावेळी पुढील अधिवेशन 20 दिवसांचे तरी घ्या, असे सुचवले होते. आता तो विषय यावेळी विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत उपस्थित केला होता. हे अधिवेशन आठवडाभराचे असले तरी प्रत्यक्षात कामकाज तीनच दिवस चालेल.

पहिल्या दिवशी राज्यपालांचे अभिभाषण होईल. शुक्रवार हा खासगी कामकाजाचा दिवस असल्याने त्यादिवशीच्या कामकाजावर मर्यादा असतात. जनता विरोध करत असलेल्या प्रकल्पांबाबत आमदार विजय सरदेसाई व आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांचा खासगी ठराव कामकाजात दाखल झाला आहे, तर फातोर्डा येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममधील एका प्रेक्षागारास माजी क्रीडामंत्री फ्रान्‍सिस मोंत क्रुझ यांचे नाव द्यावे, हा माझा ठराव दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या