केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीचा अपघात, प्रकृती गंभीर

IANS
सोमवार, 11 जानेवारी 2021

केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीचा उत्तर कर्नाटकात अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.

पणजी  :  केंद्रीय आयुषमंत्री तथा संरक्षण राज्‍यमंत्री श्रीपाद नाईक हे कर्नाटक दौऱ्यावरून गोव्यात परतत असताना यल्लापूर - गोकर्ण रस्त्यावर होस्कुंबी येथे सायंकाळी सात वाजता त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. या अपघातात नाईक हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पत्नी विजया व त्‍यांच्‍यासोबत गाडीतून प्रवास करणारे डॉ. दीपक घुमे हे ठार झाले. वाहनाने रस्त्यालगतच्या उंचवट्याला धडक दिली व नंतर कार उलटली. या अपघातात अन्य चौघेजणही गंभीर जखमी झाले आहेत. जखमी नाईक यांना रात्री पावणे बारा वाजण्‍याच्‍या दरम्‍यान अधिक उपचारासाठी ‘गोमेकॉ’त हलवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीपाद नाईक हे कर्नाटकात गेले होते. ते आज यल्लापूर येथील एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांनी शिर्शीच्या गणपती देवस्थानात जाऊन दर्शनही घेतले होते. ते यल्लापूर गोकर्ण राष्ट्रीय महामार्ग क्र. ६३ मार्गे येताना होस्कुंबी, शिरूरमार्गे गोकर्णकडे निघाले होते.

वाहनात होते पाचजण

श्रीपादभाऊंच्‍या अपघात झालेल्‍या वाहनात एकूण पाचजण होते. सूरज नाईक हा गाडी चालवत होता. तर श्रीपादभाऊंचा ‘पीएसओ’ तुकाराम पाटील हा वाहनचालकाच्‍या शेजारील आसनाजवळ बसला होता. तर श्रीपादभाऊ व त्‍यांच्‍या पत्‍नी विजया या मध्‍यभागील आसनावर बसले होते. तर डॉ. सूरज घुमे हे मागील आसनावर बसले होते, अशी माहिती कारवारच्‍या आमदार रुपाली नाईक यांनी दिली.

दोन्‍ही पायांना फ्रॅक्‍चर

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची प्रकृती स्‍थिर आहे. त्यांना दिल्लीला हलवण्याची गरज नाही. त्यांच्या पायांना दोन ठिकाणी फ्रॅक्चर आहे. क्ष - किरण तपासणी झाल्यानंतर दोन छोट्या शस्त्रक्रिया कराव्या लागणार आहेत. सध्या नाईक यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे.

नेते कार्यकर्त्यांची धाव ‘गोमेकॉ’कडे

गोमेकॉत केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना पुढील उपचारासाठी आणले जाणार हे समजल्यावर प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, संघटन सचिव सतीश धोंड, कोषाध्यक्ष संजीव देसाई, प्रदेश सरचिटणीस ॲड. नरेंद्र सावईकर, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मंत्री राजेंद्र आर्लेकर, पणजीचे महापौर उदय मडकईकर आदींसह राज्यभरातील नेते कार्यकर्त्यांनी ‘गोमेकॉ’कडे धाव घेतली. गर्दी आवरण्यासाठी पोलिसांनी दोरी बांधून मार्ग रोखावे लागले होते.

मुख्‍यमंत्री गेले सीमेवर

केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना अपघात झाल्याचे समजताच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सुरवातीला ‘गोमेकॉ’त गेले. त्यांनी तेथे डॉक्टर पथकाची सज्जता करून ते तडक कर्नाटकाच्या दिशेने पोळे येथे रवाना झाले. त्याआधी एक रुग्णवाहिकाही कर्नाटकात पाठवण्यात आली होती. मुख्यमंत्री गोव्‍याच्‍या सीमेवर पोळे येथे पोहोचेपर्यंत अंकोला येथून जखमींना घेऊन रुग्णवाहिका गोव्याच्या दिशेने रवाना झाली होती. त्या रुग्णवाहिकेत नाईक यांची प्रकृती पाहत व  आवश्यक सूचना करत मुख्यमंत्री रुग्णवाहिकेच्या आधी गोमेकॉकडे रवाना झाले. 

कार्यकर्त्यांना धक्का

श्रीपादभाऊ यांच्‍या अपघाताविषयी राज्‍यात माहिती पसरताच अनेकांना धक्का बसला. या अपघाताचे वृत्त खरे आहे का? याची खातरजमा बराचवेळ करण्‍यात येत होती. त्‍यानंतर सोशल मीडियावरून विजया नाईक यांच्‍या निधनाचे वृत्त पसरले आणि श्रीपादभाऊंच्‍या चाहत्‍यांमध्‍ये हळहळ व्‍यक्त झाली.   

रस्तामार्गे रुग्णवाहिका का?

केंद्रीय आयुष राज्यमंत्री म्हणून परिचित असलेल्या श्रीपाद नाईक यांच्याकडे संरक्षण राज्यमंत्रिपदाचाही ताबा आहे. कारवार येथील नौदलाचा आशिया खंडातील सर्वांत मोठा तळ आहे. तेथे हेलिकॉप्टर सदैव तैनात असतात. त्याशिवाय कारवार येथे नौदलाचे इस्पितळही आहे. त्यामुळे संरक्षण राज्यमंत्री या नात्याने नाईक यांना हवाईमार्गे गोव्यात हलवणे जाणे अपेक्षित होते. 

मोठा आवाज झाल्‍यावर ग्रामस्‍थ धावले!

गाडीला अपघात झाल्यावर मोठा आवाज झाला. त्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मिळेल त्या वाहनांनी जखमींना घेऊन ग्रामस्थांनी अंकोल्याच्या दिशेने धाव घेतली. जखमी व्यक्ती ही केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक आहे हे समजताच त्या दोघांना अंकोल्याच्या एका खासगी इस्पितळात नेण्यात आले, तर उर्वरीत चौघांना सरकारी इस्पितळात नेण्यात आले. नाईक यांच्या पत्नी विजया यांच्या डोक्याला मार लागल्याने वाटेतच मोठा रक्तस्त्राव झाला होता. त्यामुळे इस्पितळात पोचण्यापूर्वीच त्यांचे प्राणोत्कमण झाले होते. नाईक यांच्या हातापायाला मोठा मार लागल्याने ते बेशुद्ध झाले होते. अंकोल्यात प्राथमिक उपचार करून त्यांना गोव्यात रवाना करण्यात आले.

.असा झाला अपघात

खड्डेमय रस्‍त्‍यामुळे होस्कुंबी येथे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि जीए ०७, जी २२४५ ही कार रस्त्याच्या कडेला असलेल्या उंचवट्याला जोरदारपणे आदळली. त्यानंतर कार विरुद्ध बाजूला जोराने कलंडली. या अपघातात कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला असून नाईक हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या पत्नी विजया यांना अंकोला येथील सरकारी इस्पितळात हलवेपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉ. दीपक घुमे यांनाही या अपघातात प्राण गमवावा लागला आहे. गाडीत एकूण सहाजण होते. या वाहनात असलेले नाईक यांचे अंगरक्षक तुकाराम पाटील आणि चालक सूरज नाईक (त्‍यांचे स्‍वीय सचिव नव्‍हेत) हे अपघातात जखमी झाले आहेत.

राजनाथ सिंग यांच्याकडून दखल

संरक्षण राज्यमंत्री असलेल्या श्रीपाद नाईक यांना अपघात झाल्याचे समजल्यावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी तातडीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला. नाईक यांना उत्तमोत्तम उपचाराची व्यवस्था करावी व गरज भासल्यास दिल्लीला हलवावे, अशी सूचना त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली.

पंतप्रधानांचा दूरध्वनी
कर्नाटकात श्रीपाद नाईक यांना अपघात झाल्याचे समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी संपर्क साधला. नाईक यांच्यावरील उपचाराची व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यानंतर तातडीने मुख्यमंत्री गोमेकॉकडे रवाना झाले. भाजपचे अध्‍यक्ष जे.पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही नाईक यांच्‍या तब्‍बेतीची विचारपूस मुख्‍यमंत्र्यांकडे केली.

संबंधित बातम्या