अभियांत्रिकी अभ्यासक्रम मातृभाषा माध्यमातून सुरू करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020

काही आय.आय.टी. व एन्.आय.टी.मधून,मातृभाषा माध्यमातून अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करण्याचे केंद्र सरकारने ठरवले असल्याचे केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यानी नुकतेच जाहीर केले.

पणजी: काही आय.आय.टी. व एन्.आय.टी.मधून,मातृभाषा माध्यमातून अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करण्याचे केंद्र सरकारने ठरवले असल्याचे केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यानी नुकतेच जाहीर केले. भारतीय भाषा सुरक्षा मंच,केंद्र सरकारच्या या मातृभाषा-पोषक निर्णयाचे हार्दिक स्वागत करीत आहे असे मंचाचे राज्य सहनिमंत्रक सुभाष वेलिंगकर यांनी म्हटले आहे.

गोव्यातील भाजप सरकारने मात्र 2012 च्या निवडणुकीत जनतेला दिलेली आश्वासने पायदळी तुडवून, 21 वर्षांची,फक्त मातृभाषा माध्यमालाच अनुदान देण्याची दीर्घ परंपरा मोडीत काढून, प्राथमिक स्तरावर, सरळ सरळ चर्च-प्रणित परकीय इंग्रजी माध्यमाच्या शाळांना सरकारी अनुदान देऊन,भाजप सरकार, मातृभाषेपेक्षा सुद्धा इंग्रजीला प्रोत्साहन देत असल्याचे प्रकटपणे दाखवून दिले आहे, असा आरोप त्यांनी केला.

भाजपा पक्ष व भाजप सरकारने अशा प्रकारे, सत्ता हाती येताच,जनतेचा विश्वासघात केल्यामुळेच, 2012 च्या निवडणुकीत भाजपाला स्वबळावर सरकार बनवण्यास सर्वस्वी सहाय्यभूत ठरलेल्या भा.भा.सु.मं.ला भाजपाच्याच विरोधात आंदोलन करणे भाग पडले आणि कल्पनेत नसतानाही " गोवा सुरक्षा मंच " हा राजकीय पक्ष स्थापन करणे भाग पडले. परिणामस्वरुप भाजपा  2017च्या निवडणुकीत,21 वरून 13 वर घसरला.नंतर धावपळ,राजकीय डावपेच व नंतर अनैतिक फोडाफोडी करून भाजपाला मागील दाराने सरकार स्थापना व आमदार संख्यावाढ,केंद्रातील सरकारचा आधार घेऊन, करावी लागली, हा इतिहास ताजाच आहे असे त्यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकार मातृभाषा- पोषणासाठी जे करते व त्याबद्दल गोव्यात भा.भा.सु.मं. त्याचे स्वागत करते, त्याच्या एकदम उलटे , मातृभाषा-विरोधी धोरण गोव्यात भाजपा पक्ष व सरकारने स्वीकारले आहे. ही अतिशय दुर्दैवी, निर्लज्ज व दुटप्पी नीति आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

संबंधित बातम्या