कोरोना रुग्णांचे दिवसभरात ‘शतक’

Dainik Gomantak
रविवार, 5 जुलै 2020

राज्यात आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या आकड्याने शंभरी पार केली आहे. शनिवारी राज्यात १०८ रुग्णांची नोंद झाली असून ५३ रुग्ण बरे झाले आहेत. वास्को येथील रहिवासी असणाऱ्या एका ४५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू कोरोनामुळे त्याच्या राहत्या घरी झाल्याने राज्यात आता कोरोनामुळे सहाव्या मृत्यूची नोंद झाली आहे.

 

पणजी

राज्यात आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या आकड्याने शंभरी पार केली आहे. शनिवारी राज्यात १०८ रुग्णांची नोंद झाली असून ५३ रुग्ण बरे झाले आहेत. वास्को येथील रहिवासी असणाऱ्या एका ४५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू कोरोनामुळे त्याच्या राहत्या घरी झाल्याने राज्यात आता कोरोनामुळे सहाव्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ८५३ असून ७७६ जणांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती आरोग्य सचिव नीला मोहनन यांनी दिली. यावेळी त्यांच्यासोबत माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे सचिव संजय कुमार उपस्थित होते.
वास्को येथील मृत व्यक्ती मरणापूर्वीच आदल्या दिवशी स्वतःच कोरोना पडताळणी चाचणीसाठी आला होता. मात्र त्याला थोडा ताप होता. त्यामुळे त्याला इस्पितळात दाखल करून घेण्याची गरज भासली नाही. या व्यक्तीला कोरोना आहे, हे त्यांना सांगण्यापूर्वीच या व्यक्तीचे निधन झाले होते. मृत व्यक्तीचे वयही कमी होते, त्यामुळे त्याचा असा झालेला मृत्यू आमच्यासाठीही धक्कादायक होता, असे आरोग्य सचिव म्हणाल्या.
आरोग्‍य खात्‍याने दिलेल्‍या माहितीनुसार, आरोग्‍य खात्‍याने आज १६२३ जणांच्‍या चाचण्‍यांसाठी नमुने गोळा केले होते. तर १४६४ जणांचे अहवाल आरोग्‍य खात्‍याच्‍या हाती आले. तर ९१ देशी प्रवाशांना क्‍वारंटाईन केले आहे. इस्‍पितळातील आयसोलेशनमध्‍ये आज ९ जणांना ठेवण्‍यात आल्‍याची माहिती आरोग्‍य खात्‍याने दिली.
दरम्‍यान, रुग्‍णांमध्‍ये रस्‍ता, विमान आणि रेल्‍वेमार्गे आलेल्‍या १०८ रुग्‍णांचा समावेश आहे. एकूण रुग्णांमध्ये मडगाव येथे २० रुग्ण, केपे येथे १२ रुग्ण, लोटली येथे ५ रुग्ण, नावेली येथे २ रुग्ण, गंगानगर म्हापसा येथे ११ रुग्ण, साखळी येथे ४४ रुग्ण, कामराभाट येथे २ रुग्ण, काणकोण येथे १० रुग्ण, पर्वरी येथे ३ रुग्ण, राय येथे २ रुग्ण, वेर्णा येथे ७ रुग्ण, फोंडा येथे १० रुग्ण, पेडणे येथे ५ रुग्ण, सांगे येथे २ रुग्ण, डिचोली येथे ५ रुग्ण, म्हार्दोळ येथे १ रुग्ण आहे. याशिवाय संख्येत विविध ठिकाणच्या रुग्णांचाही समावेश आहे.

‘१०८’ ची क्षमता वाढविणार
काही दिवसांपूर्वी पणजी येथील एक रुग्ण मडगाव येथील कोव्हीड रुग्णालयात मरण पावला होता. या मृत व्यक्तीवर पणजी येथे अंत्यसंस्कार करण्यासाठी आणायचे होते, मात्र १०८ रुग्णवाहिका व्यवस्थापनाने नकार दिल्याचे कारण समोर येत होते, याबाबत स्पष्टीकरण देताना आरोग्य सचिव म्हणाल्या, या व्यक्तीवर मडगाव येथे अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय चर्चेतून घेण्यात आला होता. यामध्ये १०८ व्यवस्थापनाची आर्थिक अडचण अजिबात नव्हती. यावेळी त्या असेही म्हणाल्या, कि १०८ ला कधीकधी उशीर होतो, अधिक कामामुळेही असे होते. त्यामुळे १०८ ची क्षमता वाढविण्यासाठीचा विचार सुरू असल्याचे यावेळी मोहनन म्हणाल्या.

अंत्यसंस्कार शक्य
दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालय यांनी मडगाव पालिकेच्या स्मशानभूमीत कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठीची परवानगी दिली आहे. जर नातेवाइकांची इच्छा असेल आणि ते त्यांच्या गावी त्यांच्या संबंधितांचा मृतदेह नेऊन अंत्यसंस्कार करण्यास इच्छुक असतील तर त्यांना तशी परवानगी देण्याबाबतही विचार केला जाणार असल्याचे मोहनन म्हणाल्या.

संबंधित बातम्या