कोरोनाच्या नव्या उद्रेकामुळे ब्रिटनहून गोव्यात येणाऱ्या विमानांना 31डिसेंबरपर्यंत स्थगिती

flights from britain
flights from britain

दाबोळी- ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचे नवे रूप आढळून आल्याने दाबोळी विमानतळावर आठवड्यात चार वेळा उतरणाऱ्या युकेची हवाईसेवा ३१ डिसेंबरपर्यंत स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दाबोळी विमानतळ संचालक गगन मलिक यांनी दिली. 

भारत सरकारने याबाबत काल घोषणा केली होती. त्यानुसार दाबोळी विमानतळावर उतरणाऱ्या युकेतील साप्ताहिक विमानांवर बंदी घातली आहे.

रविवार हा दाबोळी विमानतळावर सुपर संडे ठरला. टाळेबंदीनंतर प्रथमच दाबोळी विमानतळावर २० रोजी १७ हजार ७२६ राष्ट्रीय प्रवाशांची रेलचेल झाली. या दिवशी देशातील विविध भागांतून ५८ राष्ट्रीय विमानांना हाताळण्यात आले. यात ८५३० प्रवासी गोव्यात दाखल झाले, तर ९१६० प्रवासी गोव्यातून दाबोळी विमानतळावरून रवाना झाले, अशी माहिती गगन मलिक यांनी दिली. तसेच २५ मार्च ते ३१ डिसेंबर दरम्यान ८२ खास विमानातून जवळपास १५ हजार विदेशी नागरिकांना मायदेशी पाठवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. 

संपूर्ण भारतात मार्च महिन्यात कोरोना महामारीमुळे टाळेबंदी करून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विमानसेवा स्थगित ठेवण्यात आली होती. मे महिन्यात राष्ट्रीय विमान सेवा सुरू केली होती. मे महिन्यात दाबोळीवर दिवसाला सुमारे १४ विमाने हाताळली गेली. टाळेबंदीमुळे गोव्यात अडकलेल्या विदेशी नागरिकांना मायदेशी पाठवण्यासाठी विमानतळावरून खास विमानांची सुविधा उपलब्ध केली होती. २५ मार्च ते २१ डिसेंबर दरम्यान खास विमानातून सुमारे १५ हजार विदेशी नागरिकांना मायदेशी पाठवण्यात आले. यामध्ये रशिया, इटली, स्पेन, जर्मनी, युके, अमेरिका, इंग्लंड, मंगोलिया इत्यादी राष्ट्रातील विदेशी पर्यटकांचा समावेश होता असे मलिक म्हणाले.

देशातही ब्रिटनमधून येणाऱ्या प्रत्येकाची होणार चाचणी
ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या विषाणूच्या संसर्गाचा उद्रेक झाल्यानंतर भारत सरकार देखील सावध झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या नव्या कोरोनाबाबतचे मानक दिशानिर्देश (एसओपी) आज जारी केले. कोरोनाचा हा नवा अवतार अद्याप देशामध्ये आढळून आला नसल्याने लोकांनी घाबरून जाऊ नये, असे सरकारकडून करण्यात आले.  ब्रिटनमधून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची व  कर्मचाऱ्यांची विमानतळावरच कोरोना आरटीपीसीआर चाचणी करून त्यांचे विलगीकरण करण्यात येईल.
अद्याप आपल्या देशामध्ये या नव्या विषाणूचा रुग्ण आढळून आलेला नाही त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये, असे नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी केले आहे. भारताने ब्रिटनमधून येणारी सर्व विमाने ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा कालावधी आणखी वाढू शकतो. येत्या २६ जानेवारीला भारताने ब्रिटनच्याच पंतप्रधानांना (बोरीस जॉन्सन) प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे आमंत्रण दिले आहे. त्यांच्याबरोबर त्यांचा इतर लवाजमाही येणार हे उघड आहे त्यामुळे आरोग्य यंत्रणेची धावपळ वाढणार आहे.

सीबीएसई बोर्ड परीक्षा स्थगित 
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई)  पुढील वर्षी होणाऱ्या दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षा कोरोनामुळे फेब्रुवारी २०२१ पर्यंत घेणे शक्‍य नाही, अशी स्पष्टोक्ती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आज दिली. तत्पूर्वी सीबीएसईच्या अधिकाऱ्यांनी बोर्डाच्या परीक्षा ऑनलाइन आणि वेळेवरच होतील असे म्हटले होते.  पोखरियाल यांनी मात्र परीक्षा ऑफलाईन म्हणजेच लेखी घेण्याचे संकेत दिले होते. ग्रामीण भागात २४ हजारांहून जास्त सीबीएसईच्या शाळा आहेत, त्यामुळे ऑनलाइन परीक्षा शक्‍य नसल्याचे ते म्हणाले. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com