गोव्यात महसूलरूपी लॉटरी: सरकारला मिळणार 15. 30 कोटीचा नफा

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 23 जानेवारी 2021

गोवा सरकारने नोव्हेंबर महिन्यात सुरू केलेल्या गोवा सरकारच्या लॉटरीद्वारे सरकारला वार्षिक 15 कोटी 30 लाख रुपये एवढा नफा मिळणार आहे.

पणजी: गोवा सरकारने नोव्हेंबर महिन्यात सुरू केलेल्या गोवा सरकारच्या लॉटरीद्वारे सरकारला वार्षिक 15 कोटी 30 लाख रुपये एवढा नफा मिळणार आहे. गोवा सरकारने निविदा काढून एकूण तीन एजंटना लॉटरी काढण्याचे कंत्राट दिलेले असून त्यातील दोन एजंटच्या लॉटरी सोडत निकाल सध्या सुरू आहेत. दोन्ही एजंटचे मिळून दिवसाला प्रत्येकी चार असे आठ सोडत निकाल (ड्रॉ) काढण्यात येत असल्‍याची माहिती लघू बचत आणि लॉटरी संचालनालयाच्या संचालक सुषमा कामत यांनी दिली.

आमच्या प्रतिनिधीने कामत यांची भेट घेऊन सरकारच्या लॉटरी सोडतीबाबतच्या व्यवस्थापनाबद्दल विचारणा केल्यानंतर त्‍यांनी सांगितले की,  22 नोव्हेंबर 2020 रोजी गोवा सरकारने निविदा काढून एकूण तीन लॉटरी विक्रेते एजंट नेमले आहेत. त्यामध्ये फ्युचर गेमिंग (डियर शुभलक्ष्मी विकली लॉटरी) व सुमीत मार्केटिंग (राजश्री विकली लॉटरी) व डी. एस. इंटरप्राईजेस प्रायव्हेट लिमिटेड या तीन एजंटांचा समावेश आहे. त्यातील डियर शुभलक्ष्मी विकली लॉटरी व राजश्री विकली लॉटरी सोडतींचा निकाल सुरू झालेला आहे. दिवसाला प्रत्येकी सोडतींद्वारे चार प्रमाणे दोन्ही मिळून आठ सोडत निकाल पणजी येथील लॉटरी संचालनालयाच्या सभागृहात मान्यवरांच्या उपस्थित काढण्यात येत आहे. 

लॉटरी सोडत वेळ
सकाळी  11.20 वा., दुपारी 12 वा., सायं. 3.20 वा.,  4 वा.,  5.20 वा., 6 वा., रात्री 8 वा. व 8 .40 वा. या वेळेत या लॉटरी सोडत निकाल काढण्यात येतात. ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पारदर्शक पद्धतीने निकाल जाहीर केला जातो. या लॉटरीची विक्री गोव्यासह महाराष्ट्र व पंजाबात होते. कारण तेथे लॉटरी फ्री झोन असून तेथे लॉटरी विक्रीचा परवाना त्या एजंटांनी काढलेला आहे, अशी माहिती लघू बचत आणि लॉटरी संचालनालयाच्या संचालक सुषमा कामत यांनी दिली.

अर्थसंकल्‍प 2021: ‘अर्थसंकल्‍पीय अधिवेशन 20 दिवसांचे घ्‍या’ -

15 फेब्रुवारीपासून तिसरी ‘लॉटरी’ 

गोवा सरकारच्या दोन लॉटरी सध्या सुरू असून तिसरे एजंट बी. एस. इंटरप्रायजेस यांची लॉटरी 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. प्रत्येक लॉटरी तिकिटाची  किंमत दहा रुपये आहे. प्रत्येक सोडतीचे पहिले बक्षीस 10 हजार रुपयांचे आहे. इतर बक्षिसेही देण्यात येतील, असेही कामत यांनी सांगितले.

निकाल कुणीही पाहू शकतो

फ्यूचर गेमिंगच्या डियर शुभलक्ष्मी या एजंटातर्फे एकावेळी 10 हजार तिकिटे काढण्यात येत असून सुमीत मार्केटिंग अर्थात राजश्री विकलीतर्फे लॉटरीची 1 लाख तिकिटे प्रत्येकवेळी छापण्यात येतात. रिझर्व्ह बँकेने नियुक्त केलेल्या प्रिंटिंग प्रेसमध्ये नियमानुसार ही तिकिटे छापली जात असल्याचे सांगून पणजी येथे काढण्यात येणारा सोडत निकाल पाहण्याची कुणालाही परवानगी आहे, असे कामत यांनी सांगितले.

पाच वर्षांसाठी कंत्राट
वरील तिन्ही एजंटना पाच वर्षासाठी  लॉटरी विक्रीचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यानंतर पुन्हा निविदा काढल्या जातील. तिन्ही एजंटकडून दरवर्षी 15 कोटी 30 लाख एवढी रक्कम गोवा सरकारला आगावू मिळणार आहे. या वर्षीची रक्कम मिळाली आहे, अशी  माहिती कामत यांनी दिली. लघू बचत व लॉटरी संचालनालयातर्फे या लॉटरी काढण्यात येत आहेत. काही वर्षांपूर्वी प्रोव्हेदोरियातर्फे ‘गोवा लॉटरी’ काढण्यात येत होती. मात्र, ती काही वर्षापूर्वी बंद झाली. गोवा सरकारने लॉटरीसाठी वेगळे संचालनालय स्थापन करून नव्याने लॉटरी सुरू केल्याचे कामत त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

संबंधित बातम्या