आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना पाठवले पत्र

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 12 जानेवारी 2021

सत्तरी तालुक्यातील मेळवली येथील प्रस्तावित आय आय टी प्रकल्प रद्द करावा अशी मागणी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी केली आहे.

पणजी: सत्तरी तालुक्यातील मेळवली येथील प्रस्तावित आय आय टी प्रकल्प रद्द करावा अशी मागणी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी केली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना त्यांनी तसे पत्र पाठवले आहे. सत्तरी तालुक्यातील वाळपई विधानसभा मतदारसंघाचे विश्वजित राणे प्रतिनिधित्व करतात. मेळावलीवासियांनी या प्रकल्पाविरोधात आंदोलन केले याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत, ते गुन्हे सरकारने मागे घ्यावेत अशी मागणी राणे यांनी केली आहे.

महिला आंदोलकांशी असभ्यपणे वागणाऱ्या पोलिसांवरही कारवाई करा असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.सुरूवातीला या प्रकल्पाचे समर्थन राणे यांनी केले होते मात्र मेळावलीवासियांच्या या आंदोलनाला सत्तरीच्या प्रत्येक गावातून पाठिंबा मिळू लागल्यानंतर त्यांनी सत्तरीवासियांना सोबत आपण असून सत्तरीवासियांना प्रकल्प नको असेल तर तो प्रकल्प रद्द करावा, अशी भूमिका घेतली आहे. मेळावली येथे सरकारी जमीन आहे आणि त्या जमिनीवर हा प्रकल्प करू अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. यासाठी जमिनीचे सर्वेक्षण करण्यासाठी पथक पाठवल्यानंतर तेथील ग्रामस्थांनी त्यांना हुसकावून लावले होते. पोलीस संरक्षणात जमीन मोजणीचा प्रयत्न झाला तोही ग्रामस्थांनी उधळून लावला होता. गेले तीन दिवस सत्तरी तालुक्यातील एकेक गावातील ग्रामस्थ मेळावलीवासियांना पाठिंबा देण्यासाठी येत आहेत,त्यामुळे वर्षभरावर आलेली विधानसभा निवडणूक  सरकार पक्षाला जड जाणार याची कल्पना सर्वांना आली आहे. यामुळेच आरोग्य मंत्र्यांनी आता थेटपणे हा प्रकल्प सत्तरीत नको अशी ठाम भूमिका घेतली आहे.

आणखी वाचा:

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग गोव्यात दाखल -

संबंधित बातम्या