केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईकांना दिल्लीला हलवणार नाही ; 'एम्स'च्या तज्ज्ञांची माहिती

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 13 जानेवारी 2021

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या प्रकृतीचा आढावा घेण्यासाठी काल मध्यरात्रीच्या सुमारास दिल्लीच्या एम्सच्या तीन डॉक्टरांचे पथक गोव्यात दाखल झाले.

पणजी : केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या प्रकृतीचा आढावा घेण्यासाठी काल मध्यरात्रीच्या सुमारास दिल्लीच्या एम्सच्या तीन डॉक्टरांचे पथक गोव्यात दाखल झाले. या पथकाने रात्री व आज सकाळी त्यांच्या प्रकृतीची तपासणी केली. त्यांच्यावर योग्य उपचार सुरू असल्याबद्दल समाधन व्यक्त केले. या पथकामध्ये डॉ. राजेश्‍वरी, डॉ. गायकवाड व डॉ. भाईजाम यांचा समावेश होता. त्याशिवाय डॉ. बांदेकर, डॉ. बोरकर यांच्यासह गोमेकॉचे तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. 

त्यांच्या प्रकृतीत सुधारण होत आहे व ते बोलायला लागले आहेत. पुढील ७२ तास त्यांना देखरेखीखाली ठेवले जाणार आहे व एम्सचे डॉक्टरांचे पथक दुपारी दिल्लीला परतणार असले तरी ते गोमेकॉ इस्पितळात नाईक यांच्यावर उपचार करत असलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या संपर्कात राहून आढावा घेणार आहेत.

या पथकाने उपचाराबाबत समाधान व्यक्त करून त्यांना कोठेही सध्या हलविण्याची गरज भासणार नाही असे मत व्यक्त केले आहे. सध्या त्यांचे वेंटीलेटर काढण्यात आले असून ते इनफ्लो ऑक्सिजनवर आहेत अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज सकाळी केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांच्या प्रकृतीची चौकशी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

संबंधित बातम्या