बिहारात राष्ट्रीय लोकशाही आघाडी सत्तेकडे

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 11 नोव्हेंबर 2020

बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) मिळालेला विजय म्हणजे देशभरातील मोदी लाट आजही कायम आहे, याचा पुरावा असल्याचे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.

पाटणा : कोरोना संसर्गाच्या अभूतपूर्व वातावरणात झालेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीचा निकालाचा अखेरचा टप्पाही अभूतपूर्वच ठरला. राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्वाखालील महाआघाडीने जवळपास हिसकावून घेतलेली सत्ता राखण्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीला यश येण्याची चिन्हे आहेत. भाजपची वाढलेली ताकद, नितीश यांचा घटलेला करिष्मा, तेजस्वी यांचे उदयास आलेले नेतृत्व, काँग्रेसचे तेच ते फिकेपण आणि चिराग पासवान यांना वास्तवाचे आलेले भान ही या निवडणूकीची गोळाबेरीज म्हणता येईल. या निवडणुकीतील डाव्यांचे यशही डोळ्यात भरण्यासारखे आहे.  

कोरोना काळात झालेली देशातील ही पहिलीच मोठी निवडणूक होती. बिहारच्या २४३ विधानसभा जागांसाठी तीन टप्प्यांत झालेल्या या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी जिंकलेल्या आणि आघाडीवर असलेल्या मिळून १२३ जागांवर वर्चस्व मिळाले आहे. बहुमतासाठी १२२ जागा आवश्‍यक आहेत.  तर महाआघाडी ११३ जागांवर पुढे आहे. भाजप आणि राष्ट्रीय जनता दलाने सर्वाधिक जागा मिळवत आपापल्या मित्रपक्षांवर दबाव निर्माण केला आहे. 

नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाच्या जागांमध्ये मोठी घट असली तरी तेच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असल्याने आणि आगामी राजकीय गणिते डोळ्यासमोर ठेवून भाजपने नितीश हेच मुख्यमंत्री असतील, हे स्पष्ट केले आहे. मात्र, त्यांच्यापेक्षा जागा जवळपास दुप्पट असल्याने सत्तेची सूत्रे भाजप आपल्या हातात ठेवण्यासाठी प्रयत्न करणार हे उघड आहे. 

‘एनडीए’ला काठावरचे बहुमत मिळताना दिसत आहे. या बहुमतात भाजपचा वाटा मोठा आहे. नितीश यांच्याशी भांडण न करता त्यांन आपल्या जागा वाढविल्या आहेत. मात्र, त्यांना मिळालेल्या मतांची टक्केवारी गेल्या निवडणुकीपेक्षा कमी झाल्याचे दिसत आहे. याउलट लालूप्रसाद यादव तुरुंगात गेल्यावर ‘राजद’ची धुरा हाती घेतलेल्या तेजस्वी यादव यांनी पक्षाचे महत्त्व कायम ठेवले आहे. गेल्या निवडणुकीपेक्षा त्यांना काही जागा कमी मिळाल्या असल्या तरी तेजस्वी यांचा प्रचारातील झंझावात त्यांना राज्यातील प्रमुख नेता म्हणून प्रस्थापित करण्यास पुरेसा ठरणार आहे. 

मोदी लाट अद्यापही  कायम : मुख्‍यमंत्री सावंत
पणजी : बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) मिळालेला विजय म्हणजे देशभरातील मोदी लाट आजही कायम आहे, याचा पुरावा असल्याचे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले. विकासाला आणि सुशासनाला मतदार मत देतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. फक्त घोषणा आणि जातीय मांडणी करून जनतेला भुलवता येत नाही, हेच या निकालांचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य आहे. यापुढेही देशभरात भाजपची घोडदौड अशीच सुरू राहील हे निश्‍चित, असेही ते म्हणाले. त्यांनी या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि बिहारमधील भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी यांचे अभिनंदन केले.

संबंधित बातम्या