'माझा बलात्कारही होऊ शकला असता'...असं का म्हणाली अमीषा पटेल?

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

डॉ. प्रकाश चंद्रा यांनी अभिनेत्री अमीषा पटेलला आपल्या मतदारांपुढे आणत आकर्षण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तशी भरगच्च गर्दीही तिने खेचून आणली. मात्र, प्रचाराहून परतल्यानंतर अमीषाने डॉ. प्रकाश चंद्रा यांच्यावर गंभीर आरोप करत नवीनच वादाला तोंड फोडले आहे.

औरंगाबाद-  बिहार विधानसभा निवडणुकीचा रणधुमाळी जोरात सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानही नुकतेच पार पडले आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक उमेदवारांनी आपल्या प्रचारासाठी प्रसिद्ध चेहऱ्यांना समोर आणले. बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील लोक जनशक्ति पार्टीचे उमेदवार डॉक्टर प्रकाश चंद्रा यांनीही असाच प्रसिद्ध चेहरा आपल्या प्रचारासाठी आमंत्रित केला होता. त्यांनी अभिनेत्री अमीषा पटेलला आपल्या मतदारांपुढे आणत आकर्षण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तशी भरगच्च गर्दीही तिने खेचून आणली. मात्र, प्रचाराहून परतल्यानंतर अमीषाने डॉ. प्रकाश चंद्रा यांच्यावर गंभीर आरोप करत नवीनच वादाला तोंड फोडले आहे.

अभिनेत्री अमीषा पटेलने गंभीर आरोप करताना म्हटले आहे की, बिहारमध्ये दाखल झाल्यानंतर डॉ. चंद्रा यांनी दमदाटी करत प्रचार करण्यासाठी तिला ब्लॅकमेल केले होते. ज्या जागी प्रचार केला जाणार आहे ती पाटण्यापासून जवळ असल्याचे तिला सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्ष प्रचार जेथे होणार होता ते ओबेरा पाटण्यापासून बरेच लांब असल्याने तिने प्रचाराला जाण्यासाठी नकार दिला. सायंकाळी मुंबईला लवकर परतायचे असल्याने तिने त्यांना नकार देऊनही डॉ. चंद्रा यांनी धमकावत तिच्याकडून प्रचार करवून घेतला. अर्ध्या रस्त्यापर्यंत आलेल्या अमीषाने जेव्हा पुढे जाण्यास नकार दिला तेव्हा तिचा छळ करत चंद्रा यांनी भररस्त्यात एकटे सोडून जाण्याची धमकी दिली. 

काहीही घडू शकले असते... 

याबाबत संताप व्यक्त करताना ती म्हणाली की, ‘डॉ. चंद्रा यांनी मला जबरदस्तीने गर्दीत जाण्यासाठी सांगितले.   प्रचारादरम्यान हजारो लोकांची गर्दी उपस्थित होती. ही गर्दी अक्षरश: गाडीला बाहेरून जोरजोरात ठोकत होते. यानंतरही चंद्रा यांनी मला गाडीतून उतरून गर्दीत जायला सांगितले. गर्दीतील लोक कपडे फाडण्यासाठी तयार होते. तिथे माझा बलात्कारही होण्याची शक्यता होती.’

 ओढवलेल्या प्रसंगानंतर अमीषा पुढे म्हणाली की, ‘माझा बिहारधील अनुभव फारच वाईट आहे. जे लोक निवडणूक जिंकण्याआधी माझ्यासारख्या महिलेसोबत असे वागू शकतात ते निवडणूक जिंकल्यावर जनतेसोबत कसे वागतील. प्रचार संपवून हॉटेलवर परतेपर्यंत मला काहीही  खाता आले नाही शिवाय झोपूही शकली नाही. प्रकाश चंद्रा फार खोटारडा, ब्लॅकमेलर आणि वाईट व्यक्ती आहे.’ असा आरोप तिने केला आहे.  

संबंधित बातम्या