भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी होणाऱ्या इफ्फीची नावनोंदणी सुरू

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी यंदाही उत्‍स्‍फूर्त पाठिंबा मिळत आहे. १६ ते २४ जानेवारी या कालावधीत होणाऱ्या इफ्फीची नावनोंदणी सुरू झाली असून आतापर्यंत ७०० पेक्षा अधिक सिनेरसिकांनी नावनोंदणी केली आहे.

 

पणजी: भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी यंदाही उत्‍स्‍फूर्त पाठिंबा मिळत आहे. १६ ते २४ जानेवारी या कालावधीत होणाऱ्या इफ्फीची नावनोंदणी सुरू झाली असून आतापर्यंत ७०० पेक्षा अधिक सिनेरसिकांनी नावनोंदणी केली आहे. १८ नोव्हेंबर रोजी इफ्फीसाठी नावनोंदणी सुरू झाल्यावर अवघ्या दोन दिवसांत ५६४ लोकांनी नाव नोंदविले होते, अशी माहिती गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांनी दिली. 

सध्या इफ्फीच्या तयारीसाठी अनेक बैठका सुरू आहेत. जानेवारीत महिन्यात राज्यात सजावटसुद्धा दिसायला लागेल. आता आमची तयारी कार्यलयात सुरू असल्याने बाहेर ठळकपणे दिसत नाही. मात्र, येत्या काही दिवसांतच ही तयारी दिसेल, असेही फळदेसाई म्हणाले. 

दरम्यान, फिल्म बझारसाठीसुद्धा प्रतिनिधी नोंदणी सुरू झाल्याची माहिती वेबसाइटवरून मिळाली. लवकर नावनोंद करणाऱ्यांसाठी ५००० रुपये शुल्क आकारले जाते आहे. या कमी शुल्काचा लाभ ३० नोव्हेंबरपर्यंत नावनोंदणी करणाऱ्यांनाच मिळणार आहे. १ डिसेंबर ते २० जानेवारी या कालावधीत नावनोंद करणाऱ्या प्रतिनिधींना ७००० रुपये शुल्क आणि विद्यार्थ्यांना केवळ दोन हजार रुपये शुल्क भरावे लागणार असल्याची माहिती वेबसाईटवर देण्यात आली आहे. 

यावर्षीच्या इफ्फीसाठी १००० रुपये प्रवेश शुल्क असणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी काहीच प्रतिनिधींची नावनोंदणी करून घेणे शक्य असल्याने पहिला येईल त्यालाच प्रवेश या तत्त्‍वावर यावर्षीची नावनोंदणी होत आहे. दरवर्षीप्रमाणे या महोत्सवाचे नियोजन केंद्रीय माहिती आणि प्रसारण खाते, गोवा मनोरंजन संस्था, गोवा आणि चित्रपट महोत्सव संचालनालय यांच्यामार्फत करण्यात येत आहे. यावर्षी आभासी तसेच प्रत्यक्ष अशा दोन्ही पद्धतीने इफ्फी पार पडणार आहे. ज्यांना इफ्फीसाठी स्वतःचे नाव नोंदवायचे आहे, त्यांनी  https://t.co/tSKgrrlpFL या लिंकला भेट द्या. अधिक माहितीसाठी तुम्ही https://t.co/QyoGzqMbk7 https://t.co/OojdBeDp0g  या लिंकचा वापरही करू शकता

संबंधित बातम्या