केंद्राचा मोठा निर्णय; आता 45 वर्षांवरील सर्वांना मिळणार कोरोनाची लस

केंद्राचा मोठा निर्णय; आता 45 वर्षांवरील सर्वांना मिळणार कोरोनाची लस
Vaccine

कोरोना विरुद्धच्या लढ्यात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कारण 1 एप्रिलपासून देशातील 45 वर्षांवरील सर्वांना कोरोना विषाणूची लस दिली जाणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने आज याबाबतचा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंत्रिमंडळातील या निर्णयाची माहिती आज दिली. कोरोनाची लस सर्वांसाठी आवश्यक आहे आणि त्यासाठी सर्व पात्र व्यक्तींनी स्वत:ची नोंदणी करावी, असे प्रकाश जावडेकर यांनी आज सांगितले. याशिवाय, कोरोनाविरूद्धच्या लढ्यात लस ही सर्वात महत्वाची असल्याचे पुढे त्यांनी पुढे म्हटले आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने कोरोना लसीकरणासंदर्भात घेतलेल्या निर्णयाची माहिती देताना प्रकाश जावडेकर यांनी आगामी एक ते दीड वर्षांपर्यंत सर्वांना मास्क घालावे लागणार असल्याचे सांगितले. तसेच कोरोना विरुद्धच्या लढाईत दुर्लक्ष करून चालणार नसल्याचे त्यांनी अधोरेखित केले. सध्याच्या घडीला देशातील 60 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या आणि 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. 

यानंतर, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देशातील कोरोना लसीच्या कमतरतेबाबत बोलताना लसींची संख्या आणि पुरवठा सुरळीत असल्याचे सांगितले. तसेच, देशात टप्प्याटप्प्याने लस देण्याचा निर्णय घेतला असल्याची पुस्ती त्यांनी यावेळी जोडली. शिवाय, 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाने ताबडतोब कोरोना लससाठी नोंदणी करावी आणि कोरोना लस घ्यावी, असे प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. तर, देशात अजूनही काही कोरोना प्रतिबंधक लसींची चाचणी सुरु असल्याचे सांगत, लवकरच या लसींना मंजुरी मिळण्याची शक्यता असल्याची माहिती त्यांनी दिली. 

याव्यतिरिक्त, कोव्हिशिल्ड लसीच्या दोन डोसमधील वाढवण्यात आलेल्या अंतराबाबत बोलताना, जगभरातील शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांच्या मताच्या आधारावर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. पुढे याबाबत अधिक भाष्य करताना, कोव्हिशिल्ड लसीची मात्रा 4 ते 8 आठवड्यांच्या दरम्यान घेतली जाऊ शकतेमी, असे त्यांनी नमूद केले.      

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com