जगभराच्या तुलनेत धूम्रपानात १२ टक्के भारतीय

जगभराच्या तुलनेत धूम्रपानात १२ टक्के भारतीय
12% of all smokers in the world are Indians

पणजीः जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्‍या माहितीनुसार तंबाखूमुळे जगभरात दरवर्षी ८ दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो. या ८ दशलक्षांपैकी ७ दशलक्ष लोक तंबाखूमुळे, तर उर्वरित १ दशलक्ष लोक हे अप्रत्यक्षपणे होणाऱ्या धूम्रपानाने मरण पावतात. जगभरातील १.१ अब्ज धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींपैकी एकूण ८०% लोक हे कमी अथवा मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशातील आहेत, तर या १.१ अब्ज धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींपैकी एकूण १२ टक्के लोक हे भारतातील असल्‍याची माहिती हेल्थवे इस्पितळातील डॉ. आकाशदीप अरोरा यांनी दिली.

धूम्रपानामुळे फुफ्फुसाचा कर्करोग तर होतोच, त्याशिवाय घसा, आतडे, अन्ननलिका, स्वादुपिंड तसेच रक्ताचा कर्करोग होण्याची शक्यता असते. याशिवाय धूम्रपानामुळे दमा, हृदयरोग, उच्च रक्तदाब, धमन्याचा विकार असे अनेक रोग होऊ शकतात. गेल्या काही वर्षात धूम्रपानामुळे पुरुषांमध्ये वध्यंत्व तसेच गरोदर स्त्रियांमध्ये गर्भपाताचे प्रमाण वाढल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

फुफ्फुसाचा कर्करोग मुख्यत्वे धूम्रपानामुळे होतो. यामध्ये फुफ्फुसातील पेशींची अनियंत्रित वाढ होऊन या पेशींच्या गाठी तयार होतात व यामुळे रुग्णास श्वास घेण्यास अडथळा येतो. सिगारेट तयार करताना ७००० पेक्षा जास्त रसायने वापरली जातात. यातील २५० आरोग्यास घातक आहेत, तर ७० रसायने ही कार्सिनोजेनिक एजंट आहेत. सिगारेटचे व्यसन हे त्यातील निकोटीनमुळे लागते तसेच निकोटीनचे वाहक असलेला अमोनिया ही तीव्रता वाढविण्यास मदत करतो. सिगारेट सोबत असणारे फिल्टर हे यातील घातक रसायने अडवितो असे म्हटले जाते. मात्र, हे साफ चुकीचे आहे. त्यामुळे धूम्रपान करणाऱ्यांना घशातील खवखव, कफ असे त्रास होत असतील, तर दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांना दाखवावे. कफ, थकवा अशा लक्षणांकडे लोक दुर्लक्ष करतात, परंतु त्यामुळे सुरवातीच्या टप्प्यातील (१ व २) फुफ्फुसाचा कर्करोग शोधणे अवघड होऊन बसते. सुरवातीच्या टप्प्यात जेव्हा कर्करोग फुफ्फुसापुरता मर्यादित असतो तेव्हा कफमधून रक्त पडते या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.

अचानकपणे आवाज कर्कश होणे हेही एक लक्षण आहे. कारण सुरवातीच्या काळात कर्करोग स्वरयंत्राचे नुकसान करतो. नंतरच्या टप्प्यात कर्करोग इतर इंद्रियांवरही पसरतो. यामुळे भूक न लागणे, वजन कमी होणे, अशक्तपणा अशा समस्याही निर्माण होत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
सिगारेट सोडल्याने कर्करोगाचा धोका तर कमी होतोच, शिवाय आरोग्य निरोगी होऊन जगण्याचा दर्जा वाढतो. सिगारेट सोडल्यानंतर काही तासातच हृदयाचे ठोके, रक्तदाब सर्वसाधारण होतो. काही आठवड्यात कफ व श्वसनात होणारे अडथळे कमी होतात, तर काही महिन्यात हृदयरोग व अस्थमाच्या शक्यता कमी होतात. सिगारेट सोडण्यासाठी तुमची इच्छा शक्ती खूप जास्त असायला हवी. निकोटीनचे व्यसन कमी करण्यासाठी निकोटीन रिप्लेसमेंट थेरपीचा वापर होतो. यामध्ये निकोटीनचे चुइंग गम अथवा इनहेलर यांचा वापर होत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com