भटकळ येथे १२ कोरोना रुग्ण

Dainik Gomantak
शनिवार, 9 मे 2020

भटकळमध्ये कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणावर झाल्याने गोव्यातून भटकळमध्ये जाण्यासाठी येणाऱ्यांना कर्नाटकात प्रवेश दिला जात नाही. मजुर मिळेल त्या वाहनाने आपले गाव गाठताना दिसत आहेत. अनेकजण पायीच गावी निघाले आहेत.

 

चैतन्य जोशी

कारवार

कारवार जिल्ह्यातील भटकळ येथील आणखीन १२ जण कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. त्यांना उद्या कारवारच्या जिल्हा इस्पितळात उपचारासाठी आणण्यात येणार आहे अशी माहिती आज जिल्हाधिकारी डॉ. के. हरीश कुमार यांनी दिली. कारवार शहर गोव्याच्या पोळे या दक्षिण टोकाकडील शेवटच्या गावाच्या हद्दीपासून केवळ १३ किलोमीटरवर आहे.
सध्या गोव्यातून कर्नाटकात मजूर येत आहेत. कर्नाटकातील ओळखपत्र दाखवूनच त्यांना कर्नाटक प्रशासन प्रवेश देत आहे. त्यांच्या आरोग्याची तपासणी गोव्याच्या हद्दीत केली जात नसून कर्नाटक सरकार त्यांची तपासणी करत आहे. भटकळमध्ये कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणावर झाल्याने गोव्यातून भटकळमध्ये जाण्यासाठी येणाऱ्यांना कर्नाटकात प्रवेश दिला जात नाही. मजुर मिळेल त्या वाहनाने आपले गाव गाठताना दिसत आहेत. अनेकजण पायीच गावी निघाले आहेत.
कर्नाटकाच्या उत्तर कन्नड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांवर उपचाराची सोय कारवारच्या सरकारी जिल्हा इस्पितळात करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आज म्हणाले, राज्य सरकारने कळवल्यानुसार आज १२ कोरोना संक्रमीत सापडले आहेत. ६ मे रोजी एका युवतीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्या युवतीच्या संपर्कात आलेले १० जण तिच्या कुटुंबातील असून जाहीर झालेल्या १२ जणांत समावेश आहे. उर्वरीत दोन रूग्ण हे एक तिची मैत्रीण तर दुसरी व्यक्ती शेजारी आहे. कोरोनाचा प्रसार कुठे झाला याची नीट माहिती मिळाल्याने जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना हाती घेत त्याचा प्रसार रोखण्यात यश मिळवले आहे. भटकळमध्ये आता बाहेरील व्यक्तींना बंदी घालण्यात आली आहे. तेथूनही कोणाला बाहेर येऊ दिले जात नाही.
कारवार जिल्ह्यात भटकळ वगळता अन्यत्र कोरोनाची लागण झाली नसल्याने जनतेने घाबरून जाऊ नये असे आवाहन करून ते म्हणाले, या भटकळमधील या तीन कुटूंबातील व्यक्ती मंगळूरच्या न्यूरो इस्पितळात जाऊन आल्याची माहिती आहे.जिल्ह्य़ातील लोकानी मंगळूरच्या नीरो इस्पितळाला भेट दिल्यास स्वतःहून जिल्हा व्यवस्थापनाला माहिती द्यावी. बाहेरील राज्यातून कारवार जिल्ह्यात येणाऱ्या सर्वांना शासनाच्या सूचने प्रमाणे अलगीकरण करून ठेवण्यात येत आहे. भटकळमध्ये विनाकारण लोकांनी फिरू नये यासाठी पोलिस बंदोबस्तात वाढ केली आहे.
जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोशन म्हणाले, उपचारासाठी भटकळच्या रुग्णांना कारवारच्या जिल्हा इस्पितळात आणण्यात आले आहे. लोकांनी घाबरून जाऊ नये. यापूर्वीही जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांवर या इस्पितळात उपचार केले आहेत. सध्या घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करणे सुरु केले आहे. त्याला जनतेने सहकार्य करावे. कोरोनाची लक्षणे नसलेले रुग्ण असू शकतात.ते शोधण्यासाठी ही शोध मोहिम राबवली जात आहे.

संबंधित बातम्या