पंजाबमधील शेतकऱ्यांकडून नव्या कृषी विधेयकांचा विरोध करण्यासठी १७६ मोबाईल टॉवरचं नुकसान

PTI
सोमवार, 28 डिसेंबर 2020

नव्या कृषी विधेयकांचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी गेल्या २४ तासांत १७६ मोबाईल टॉवरचे नुकसान केले आहे. त्यामुळे नुकसान केलेल्या एकूण टॉवरची संख्या १४११वर गेली आहे.

चंडीगड  :   नव्या कृषी विधेयकांचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी गेल्या २४ तासांत १७६ मोबाईल टॉवरचे नुकसान केले आहे. त्यामुळे नुकसान केलेल्या एकूण टॉवरची संख्या १४११वर गेली आहे. शेतकऱ्यांनी मोबाईल टॉवर उद्‍ध्वस्त करू नयेत, असे आवाहन पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी रविवारी केले होते. मात्र त्याकडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले. प्रामुख्याने मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या मालमत्तांना शेतकऱ्यांनी लक्ष्य केले आहे. शेतकऱ्यांनी ‘जिओ’ची सेवा देणाऱ्या मोबाईल टॉवर प्रामुख्याने उद्‍ध्वस्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मोबाईल टॉवरला होणारा विद्युत पुरवठा खंडित करणे, टॉवर पाडण्याचा प्रयत्न करणे, टॉवरच्या देखभालीचे काम करणाऱ्यांना मारहाण करणे असे प्रकारही संतप्त शेतकऱ्यांनी केल्याची माहिती आहे. 

शेतकऱ्यांनी मोबाईल टॉवरचे नुकसान केल्याने अनेक ठिकाणी संपर्क यंत्रणेत अडथळे निर्माण झाले आहेत. शेतकऱ्यांनी संयम बाळगावा, जबाबदारीने वागावे, कायदा हातात घेऊ नये. मोबाईल टॉवरचा विद्युत पुरवठा खंडित केल्याने त्याचा विद्यार्थ्यांवरही परिणाम होत आहे. तसेच ही कृती पंजाबच्या हिताच्या विरोधी आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे.

संबंधित बातम्या