देशातील ६३ विमानतळावर १९८ बॉडी स्कॅनर

PTI
सोमवार, 20 जुलै 2020

मेटल डिटेक्टरची जागा घेणार; पुण्यात १२ स्कॅनर बसवणार

नवी दिल्ली

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे भारतीय विमान प्राधिकरणाने देशातील ६३ विमानतळासाठी १९८ बॉडी स्कॅनर तातडीने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. हे बॉडी स्कॅनर सध्याच्या धातूच्या चौकटीची आणि धातू शोधक यंत्राची (मेटल डिटेक्टर) जागा घेतील. या माध्यमातून प्रवाशाकडील धातूच्या वस्तूची तपासणी केली जाते.
विमानतळावर अत्याधुनिक बॉडी स्कॅनर खरेदीची प्रक्रिया कोरोना संसर्ग सुरू होण्यापूर्वीच झाली होती. सध्या कोविड-१९ मुळे विमानतळावरील कर्मचाऱ्यांची आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या कमी केलेली असताना बॉडी स्कॅनरची खरेदी लवकरात लवकर करणे गरजेचे आहे, असे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याने सांगितले. देशात भारतीय विमान प्राधिकरणाच्या अधिपत्याखाली शंभराहून अधिक विमानतळ आहेत. एकूण १९८ बॉडी स्कॅनरपैकी १९ स्कॅनर चेन्नई विमातळावर, १७ स्कॅनर कोलकता विमानतळावर आणि १२ स्कॅनर पुणे विमानतळावर बसवण्यात येणार आहेत. याशिवाय श्रीनगर विमानतळावर सात, विशाखापट्‌टण येथे सहा आणि तिरुपती, बागडोग्ररा, भुवनेश्‍वर, गोवा आणि इंफाळ येथे प्रत्येकी पाच स्कॅनर बसवण्यात येणार आहेत. तसेच अमृतर, वाराणसी, कालिकत, कोइमतूर, त्रिची, गया, औरंगाबाद आणि भोपाळ येथे प्रत्येकी चार स्कॅनरची व्यवस्था केली जाणार आहे. देशभरातील विमानतळावर बॉडी स्कॅनर बसवण्यासाठी निविदा काढल्या असून तीन कंपन्यांनी रस दाखवला आहे. तिन्ही कंपन्यांच्या उत्पादनाची तांत्रिक पातळीवर तपासणी केली जाणार आहे. तांत्रिक निकषात बसल्यानंतर त्यांना बजेट सादर करण्याचे सांगितले जाणार आहे. यापैकी एकाची निवड केली जाईल, असे अधिकाऱ्याने नमूद केले. सध्या प्रवाशाला बॉडी स्कॅनरमधून जाण्यासाठी जाड कपडे, जाकेट, बूट, बेल्ट, पैशाचे पाकिट, मोबाईल आदी वस्तू काढून ठेवाव्या लागतात.एखाद्या पुतळ्याप्रमाणे त्याला बॉडी स्कॅनरमध्ये जावे लागते. तपासणीदरम्यान, पिवळा लाइट लागला तर आणखी चाचणी करण्याची गरज आहे, असे समजले जाते. परंतु अत्याधुनिक बॉडी स्कॅनर बसवल्यानंतर ‘पॅट डाउन’ शोधाची गरज राहणार नाही. नवीन बॉडी स्कॅनर हे सध्याच्या डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर आणि हँड हेल्ड स्कॅनरची जागा घेईल.
सीआयएसएफ कर्मचाऱ्यांचे संरक्षण
कोरोना संसर्गाचा फैलाव झाल्यानंतर विमानतळाची सुरक्षा पाहणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला देशातील ६३ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांशी कमीत कमी संपर्क कसा राहिल, याबाबत सूचना दिल्या होत्या. मास्क, सर्जिकल पोशाख आदींचा पेहराव करण्याबरोबरच प्रवाशांच्या वस्तूंना हात लावण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. प्रवाशांशी चर्चा करताना सुरक्षेशी कोणतिही तडजोड करु नये, असेही सांगण्यात आले होते. बॉडी स्कॅनरमुळे सीआयएसएफच्या जवानांचा प्रवाशांशी कमीत कमी संपर्क राहिल.
वैशिष्ट्ये
देशातील ६३ विमानतळावर १९८ बॉडी स्कॅनर
चेन्नई, कोलकता, पुणे विमानतळास प्राधान्य
कोविड-१९ च्या प्रसारामुळे निर्णय
सीआयएसएफचे जवान संसर्गापासून सुरक्षित राहतील

संपादन- अवित बगळे

संबंधित बातम्या