'शेतकरी आंदोलनाचा आवाज थेट संसदेत पोहोचला'

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 26 डिसेंबर 2020

दिल्लीच्या सीमांवर गेले सुमारे महिनाभर शांततेत आंदोलन करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांची मुख्य मागणी कोणतेही अधिवेशन चालू नसतानाही काल थेट संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये व पंतप्रधानांसमोर घुमली.

नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमांवर गेले सुमारे महिनाभर शांततेत आंदोलन करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांची मुख्य मागणी कोणतेही अधिवेशन चालू नसतानाही काल थेट संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये व पंतप्रधानांसमोर घुमली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहण्यासाठी आलेले असताना आम आदमी पक्षाच्या खासदारांनी त्यांच्यासमोरच ‘काला कानून वापस लो’ अशा जोरदार घोषणा दिल्या. यामुळे संसदेच्या सुरक्षा यंत्रणेची काही काळ चांगलीच धावपळ झाली.  

गेला महिनाभर कडाक्‍याच्या थंडीला न जुमानता हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमांवर तळ ठोकून बसले आहे. तिन्ही कायदे रद्द करा ही त्यांची पहिलीच मागणी मोदी सरकारने वारंवार फेटाळून लावली आहे. पंतप्रधानांच्या कानावर शेतकऱ्यांच्या मागण्या थेटपणे जाव्यात यासाठी आपच्या खासदारांनी सेंट्रल हॉलमध्ये घोषणाबाजी केली. पंतप्रधानांसोबत लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला, विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, कॉंग्रेसचे नेते अधीररंजन चौधरी आदींसह काही खासदारही उपस्थित होते. आज सकाळी पंतप्रधानांनी सेंट्रल हॉलमध्ये येऊन अटलजींच्या प्रतिमेला हार अर्पण केला. त्यानंतर ते उपस्थितांशी संवाद साधत असतानाच आपचे संगरूरचे खासदार भगवंत मान व राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी घोषणाबाजी केली व पोस्टरही झळकावली. ‘किसान विरोधी काले कानून वापस लो’, अन्नदाता किसानों को आतंकवादी कहना बंद करो’, ‘एमएसपी की गारंटी दो’ अशा घोषणा देणे सुरू केले. स्वतः मोदी मात्र या दोघांकडेही संपूर्ण दुर्लक्ष करत सेंट्रल हॉलमधून बाहेर पडले. ते जात असतानाही मान त्यांच्या दिशेने जाऊन थंडीत गारठलेल्या शेतकऱ्यांना न्याय द्या, असे जोरजोरात सांगू लागले. त्यावेळी मार्शलनी त्यांना अडवले.

संबंधित बातम्या