भटकळमध्ये कोरोनाचे २१ रुग्ण

Dainik Gomantak
रविवार, 10 मे 2020

आज नव्याने सापडलेले रूग्ण हे काल सापडलेल्या १२ रुग्णांच्या संपर्कात आले होते. या सर्वांच्या संपर्कात आलेल्या आणखीन ६० जणांच्या घशाच्या स्रावाचे नमूने घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल आल्यानंतर भटकळमध्ये कोरोनाचा प्रसार थांबला आहे की तो सुरुच आहे ते स्पष्ट होणार आहे.

चैतन्य जोशी

कारवार

गोव्याला लागून असलेल्या कर्नाटकाच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील भटकळ येथे कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आज २१ वर पोचली. जिल्हाधिकारी डॉ. के. हरीश कुमार यांनी आज सायंकाळी दिलेल्या माहितीनुसार आज दिवसभरात आणखीन ८ रुग्णांचे वैद्यकीय अहवाल आले. त्या सर्वांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांना उपचारासाठी कारवारच्या सरकारी जिल्हा इस्पितळात हलवण्यात आले आहे.
भटकळमध्ये आता पूर्ण व्यवहार बंद केले असून भटकळच्या सीमा बंद केल्या आहेत. वैद्यकीय कर्मचारी व अत्यावश्यक सेवेचे कर्मचारी सोडून अन्य कोणालाही भटकळमध्ये प्रवेश दिला जात नाही. आज नव्याने सापडलेले रूग्ण हे काल सापडलेल्या १२ रुग्णांच्या संपर्कात आले होते. या सर्वांच्या संपर्कात आलेल्या आणखीन ६० जणांच्या घशाच्या स्रावाचे नमूने घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल आल्यानंतर भटकळमध्ये कोरोनाचा प्रसार थांबला आहे की तो सुरुच आहे ते स्पष्ट होणार आहे. जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरुच ठेवले आहेत,अशी माहिती त्यांनी दिली.
रुग्णांपैकी सात जण एका कुटुंबातील असून एकजण त्यांचा शेजारी आहे. अन्य शेजाऱ्यांचेही वैद्यकीय अहवाल येणे बाकी असल्याचे नमूद करून त्यांनी सांगितले, की या आठ जणांच्या संपर्कात किती जण आले त्याची माहिती संकलीत करून त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमूने घेणे सुरु केले आहे. आजवर भटकळमधील १२ जण उपचार घेऊन बरे झाले असल्याने जनतेने घाबरून जाण्याचे कारण नाही तरीही मुखावरण  (मास्क) घालून वावरणे, समाज अंतर पाळून सर्व व्यवहार करणे सुरुच ठेवले पाहिजे. मंगळूर येथील एका खासगी इस्पितळात यापैकी काही जण उपचारासाठी गेले होते. त्यातून ९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. यामुळे त्या खासगी इस्पितळात उपचार घेऊन आलेल्यांनी स्वतःहून त्याची माहिती जिल्हा प्रशासन वा स्थानिक अधिकाऱ्यांना द्यावी. त्यातून कोरोनाचा प्रसार रोखण्यात मदत होईल. त्या इस्पितळाच्या व्यवस्थापनाचा संक्रमणाचा स्त्रोत शोधण्यास सांगितले आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. रोशन यांनी सांगितले, जिल्हा इस्पितळातील खिडक्यांची तावदाने बंद केली असली तरी आतील गरम हवा बाहेर जाण्यासाठी शक्तीशाली पंखा भितींच्या वरच्या बाजूला बसवला आहे. रुग्णांपैकी काही जण धर्माचारण म्हणून उपवास करण्याचा हट्ट धरत होते. त्यांना उपचारासाठी तसे न करण्याची विनंती करून त्यांना समजावले आहे. 

संबंधित बातम्या