कालच्या देशव्यापी संपात तब्बल २५ कोटी कर्मचारी सहभागी झाले होते

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020

सरकारच्या आर्थिक धोरणाविरोधात काँग्रेस आणि डावे पुरस्कृत विविध संघटनांनी काल देशव्यापी संप पुकारला होता. यात केरळ, झारखंड, तमिळनाडू, आसामसह काही राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला तर पश्‍चिम बंगाल, ओडिशात संमिश्र प्रतिसाद मिळाला.

नवी दिल्ली : सरकारच्या आर्थिक धोरणाविरोधात काँग्रेस आणि डावे पुरस्कृत विविध संघटनांनी काल देशव्यापी संप पुकारला होता. यात केरळ, झारखंड, तमिळनाडू, आसामसह काही राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला तर पश्‍चिम बंगाल, ओडिशात संमिश्र प्रतिसाद मिळाला. देशभरातील आंदोलनात २५ कोटीहून अधिक कर्मचारी सहभागी झाल्याचा दावा संघटनांनी केला आहे. अनेक ठिकाणी कृषी कायदा आणि आर्थिक धोरणाच्या विरोधात आंदोलन व घोषणाबाजी करण्यात आली.

केरळमध्ये बंदला चांगला प्रतिसाद
तिरुअनंतपूरम : इंटक, आयटक, मजदूर सभा, सीटू, आयटक, ट्रेड यूनियन कॉर्डिनेशन सेंटर, सेवा या प्रमुख कामगार संघटनांसह अन्य संघटनांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणाच्या विरोधात एक दिवसाचा संप पुकारला.या बंदला केरळमध्ये चांगला परिणाम दिसून आला. राज्यात आज दुकाने बंद होती तसेच सार्वजनिक वाहतूक सेवाही स्थगित करण्यात आली. सरकारी कार्यालय, बँक आणि विमा कार्यालयसह अनेक क्षेत्रातील व्यवहार आज थंडावले होते. सर्व सरकारी कार्यालय आणि व्यापारी संकुल, केंद्र देखील बंद ठेवण्यात आले होते. यादरम्यान बंदमधून शबरीमाला भाविकांना वगळण्यात आले. त्यामुळे मंदिरात भाविकांची वर्दळ कायम राहिली. काही जिल्ह्यातील लहान व्यावसायिकांनी दिवसभर दुकान बंद ठेवण्याच्या निर्णयाबद्धल नाराजी व्यक्त केली.

पश्‍चिम बंगालमध्ये जनजीवन विस्कळीत
कोलकता: देशव्यापी संपामुळे पश्‍चिम बंगालमध्ये जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले. काही भागात वादावादी, बाचाबाचीचे प्रकार घडले. या बंदमध्ये माकप आणि सिटू, डीवायएफआय संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोलकता परिसरातील जाधवपूर, गारिया, कमालगाझी, लेक टाउन, डमडम येथे मोर्चे काढले. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. सेंट्रल एव्हेन्यू, हास्टिंग्ज, श्‍यामबाजार, मौलाली येथे रस्ता रोको करण्यात आले. सेल्दाह विभागातंर्गत असलेली उपनगरी रेल्वे सेवा विस्कळीत झाली. काही स्थानकावर रेल्वे रोको करण्यात आले.

ओडिशात ठिकठिकाणी रास्ता रोको
भुवनेश्‍वर: कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदला ओडिशातील काही भागात चांगला तर काही ठिकाणी संमिश्र परिणाम जाणवला. राज्यातील अनेक भागात कामगार संघटनांनी रास्ता रोको आंदोलन केले. त्यात भुवनेश्‍वर, कटक, रुरकेला, संभलपूर, बेहरामपूर, भद्रक, बालासोर, खुर्दा रायागडा आणि पारादिप या शहरांचा समावेश होता. राज्यात आज सकाळी सहापासून बंद पाळण्यात आला. काही ठिकाणी आंदोलकांनी व्यापाऱ्यांना दुकान बंद ठेवण्याचे आवाहन केले. विविध मार्गावर आंदोलन असल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. बस, मालट्रक आणि अन्य वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

आमच्या वेबसाईटवरच्या आधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
 

अधिक वाचा : 

रोशनी कायद्याअंतर्गत जमीनीचा लाभ उठविणाऱ्यांमध्ये फारूख अब्दुल्ला यांच्या बहिणीचे नाव 

भारतातर्फे मल्याळम चित्रपट ‘जल्लिकट्टू’ऑस्करच्या शर्यतीत 

उत्तर प्रदेशात बळजबरीने धर्मांतर केल्यास तुरुंगाची हवा

 

संबंधित बातम्या