विषारी दारू पिल्याने पंजाबमध्ये 26 जणांचा मृत्यू

अवित बगळे
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

या घटनेच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.

अमृतसर

विषारी दारू पिल्याने 26 नागरिकांचा मृत्यू झाल्याल्या तीन धक्कादायक घटना पंजाबमधून समोर आल्या आहेत. पंजाबमधील अमृतसर, बटाला आणि तरनतारन भागात या घटना घडल्या आहेत. या प्रकरणी संबंधित दारूविक्रेत्यांना अटक केली असून, एका पोलिस निरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.
या घटनेच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. पोलिस महासंचालक दिनकर गुप्ता यांनी सांगितले की अमृतसर भागात 29 जुलैला पहिल्या पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर 30 जुलैला सायंकाळी आणखी दोघांचा मृत्यू झाला. तेथील एकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
यानंतर बटाला शहरात विषारी दारूच्या घटना समोर आल्या. या भागात सहा जणांना विषारी दारूची बाधा झाला होती. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
तसेच तरनतारन भागात दहा जणांचा बळी गेला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीसाठी जालंधरच्या विभागीय आयुक्तांची निवड करण्यात आली आहे. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. तसेच राज्यात अशा प्रकारे चालणाऱ्या दारूची दुकाने किंवा उत्पादनाच्या ठिकाणांवर कारवाईचे निर्देशही त्यांनी दिले. दरम्यान, विषारी दारूची विक्री करणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.

 

 

संबंधित बातम्या