कोरोना लसीकरणासाठी आजचा दिवस महत्त्वाचा..देशभरात ड्राय रन पार पडणार

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जानेवारी 2021

कोरोना विषाणूवरील लसींच्या ड्राय रनचा दुसरा टप्पा आज देशात पार पडत आहे. उत्तर प्रदेश आणि हरियाणा वगळता देशातील सर्वट राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोना लसीचं ड्राय रन आज पार पडणार आहे.

नवी दिल्ली :  कोरोना विषाणूवरील लसींच्या ड्राय रनचा दुसरा टप्पा आज देशात पार पडत आहे. उत्तर प्रदेश आणि हरियाणा वगळता देशातील सर्वट राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोना लसीचं ड्राय रन आज पार पडणार आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आज महाराष्ट्राच्या 30 जिल्हे आणि 25 महापालिका क्षेत्रांमध्ये कोरोना लसीकरणाचं ड्राय रन केलं जाणार आहे.

अशी होणार रंगीत तालीम

लस वितरणासाठी प्रत्येक राज्यामध्ये किमान तीन केंद्रे निश्चित केली जातील, याठिकाणी लाभार्थींना नोंदणी करता येईल. तत्पूर्वी सर्वसाधारण मोहिमेप्रमाणेच ही रंगीत तालीम घेतली जाणार असून केंद्राच्या दिशानिर्देशांनुसार राज्यांना दोन शहरे निवडावी लागतील. या शहरांमध्ये कोरोना प्रतिबंधक लस पोहोचविणे, ही लस रुग्णालयांपर्यंत नेऊन डोस देण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. यामध्ये शीतपेट्यांमध्ये लशीची साठवणूक, लाभार्थींची नोंदणी, लस दिल्यानंतरचा वैद्यकीय सल्ला या प्रक्रियांचाही समावेश असेल. 

केंद्र सरकारने याआधीच देशातील सर्व राज्यांना व केंद्रशासित प्रदेशांना कोविडच्या लशीसाठी तयार राहण्याविषयी सूचना दिल्या आहेत. आरोग्य सचिवांनी राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांबरोबर एक उच्चस्तरीय बैठकही घेतली आहे. व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या मदतीने आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी लसीकरणासाठी करण्यात येणाऱ्या तयारीचा आढावाही या बैठकीत घेतला. 

जानेवारी २०२१मध्ये देशातील सर्वच राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांमधील किमान ३ स्थळांवर या लसीकरणाचे ड्राय रन होणार आहे. काही राज्य हे ड्राय रन काही दुर्गम जिल्ह्यांमध्य़ेही राबवू शकतात. विशेषत: महाराष्ट्र आणि केरळ ही राज्ये आपल्या राजधानीव्यतिरिक्त दुसऱ्या मोठ्या शहरांमध्ये राबवू शकतात. खऱ्या लशीच्या वितरणात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी हे ड्राय रन घेण्यात येत असून लसीकरण कार्यक्रमांतर्गत तयार करण्यात आलेले co-WIN अॅप्लीकेशन लसीकरणाच्यावेळी कसे काम करेल याचे निरीक्षण करून त्याची नोंद ठेवली जाणार आहे.  

 

 अधिक वाचा :

बीग बी ची कॉलर ट्यून म्हणजे डोक्याला शॉट: दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

 

संबंधित बातम्या