बंगळूर हिंसाचारात तीन ठार

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 13 ऑगस्ट 2020

कॉंग्रेस आमदाराच्या घरावर हल्ला : पोलिसांसह अनेक जण जखमी, जाळपोळ

बंगळूर

फेसबुकवर धर्माची बदनामी करणारा मजकूर पोस्ट केल्यावरून बंगळूरातील बनासवाडी पोलिस उपविभागात मंगळवारी रात्री दंगल उसळली. हिंसक जमावाने कॉंग्रेसचे आमदार अखंड श्रीनिवासमूर्ती यांच्या घरावर हल्ला केला. यावेळी मोठ्या प्रमाणात घरांवर दगडफेक करून अनेक वाहने पेटवून दिली तर काही वाहनांची मोडतोडही केली. या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला असून पोलिस कर्मचाऱ्यांसह 60 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी, मंगळवारी रात्री लाठी, लोखंडी रॉड, धारदार वस्तू आणि इतर शस्त्रे घेऊन चिथावणीखोर जमावाने आमदारांच्या घरात घुसून धुडगूस घातला. हिंसक घटनांचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करणाऱ्यांवरही जमावाने हल्ला केला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार कॅमेरे आणि मोबाईल हिसकावून घेऊन ते फोडून टाकण्यात आले. जमावाने डी. जे. हळ्ळी पोलिस ठाण्यासमोर वाहने एकत्रित करून त्यांना आग लावली. याशिवाय पोलिस स्थानकावरही जोरदार दगडफेक केली.
आंदोलकांनी ईशान्य विभागाचे पोलिस उपायुक्त भीमाशंकर गुलेड यांच्या गाडीवरही हल्ला केला. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करीत डीसीपींनी घटनास्थळाला भेट दिली असता पोलिस स्थानकाच्या गेटसमोर निदर्शकांनी त्यांना रोखले आणि दगडफेक केली. पोलिस कर्मचारी डीसीपींना सुरक्षित ठिकाणी घेऊन जात असतानाही जमावाने त्यांच्या वाहनावर हल्ला करून त्याचे नुकसान केले. पोलिस अधिकाऱ्यांच्या वाहन चालकालाही मारहाण केली. 600 हून अधिक जणांनी के. जी. हळ्ळी पोलिस स्थानकावरही हल्ला केला. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सुरू झालेला हिंसाचार तासाहून अधिक वेळ सुरू होता. जमावाने जवळपासच्या घरांची व वाहनांची तोडफोड सुरू केली. त्यामुळे त्या भागात राहणारे रहिवाशी घाबरून मुले व महिलांसह घरे सोडून दुसरीकडे जात होते.
परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी के. जी. हळ्ळी पोलिस ठाण्यासमोर हवेत गोळीबार केला. तरीही जमाव शांत झाला नाही. या हिंसाचारात एकाचा मृतदेह सापडला असून या व्यक्तीचा मृत्यू चेंगराचेंगरीत की गोळीबारात झाला याची पुष्टी देण्यास पोलिसांनी नकार दिला. पण, या हिंसाचारात एकूण तिघांचा मृत्यू झाला असून अनेक घरे व वाहनांचे प्रंचड नुकसान झाले आहे.
सध्या बंगळूरमधील परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. के. जी. हळ्ळी व डी. जे. हळ्ळी येथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 144 कलमही जारी करण्यात आला आहे. हिंसाचाराची पोलिस चौकशी करीत असून आतापर्यंत 110 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आमदारांचे आवाहन
आमदार अखंड श्रीनिवासमूर्ती यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला आहे ज्यामध्ये ते म्हणातात की, "मी माझ्या सर्व धर्मीय बांधवांना शांतता प्रस्थापित करण्याचे व अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करतो. आपण सर्व समान आहोत. जो कोणी सुसंवाद बिघडवण्याचा प्रयत्न करीत असेल त्यांच्यावर गंभीरपणे कारवाई केली जाईल आणि कायद्यानुसार पोलिस त्यांना शिक्षा करतील. परंतु आपण या हिंसाचाराचा अवलंब करू नये. सर्वांनी शांतता राखण्याची मी विनंती करीत आहे.' हिंसाचारानंतर चामराजपेठचे आमदार बी. झेड. जमीर अहमद खान यांनीही घटनास्थळी धाव घेत के.जी. हळ्ळी पोलिस स्थानकाला भेट दिली. पोलिस आयुक्त कमल पंत यांनीही घटनास्थळी धाव घेतली.

फेसबुक पोस्टवरून ठिणगी
आमदारांच्या सुत्रांनी खुलासा केला आहे की, फेसबुकमधील अपमानास्पद पोस्टमुळे जमाव खवळला होता. आमदारांच्या नातेवाईकाने ही अपमानस्पद पोस्ट केल्याचा आरोप करण्यात येत होता. ही पोस्ट आमदारांच्या खासगी साहाय्यकानेही पोस्ट केल्याचा आरोप काहीजण करीत होते. तथापि, बंगळूर पोलिसांनी खुलासा केला आहे की, अद्याप या आरोपांची पडताळणी झालेली नाही. जमावाने त्या भागाचा ताबा घेऊन पोलिस व अग्निशामक आणि आपत्कालीन सेवा कर्मचाऱ्यांना प्रवेश मिळू नये, यासाठी पाच ते सहा चौक सील करून त्यानंतर हिंसाचार केला आहे.

विशेष दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी
बंगळूरमधील हिंसाचार प्रकरणाची विशेष दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी बैठक घेऊन या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करण्यात आला. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हा दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना गृहमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, "डी.जे.हळ्ळी आणि के.जी. हळ्ळी पोलिस ठाण्यांच्या हद्दीत मंगळवारी रात्री झालेले दंगल प्रकरण जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केलेल्या व्यक्तीनेच नुकसान भरपाई केली पाहिजे. या आदेशानुसर दंगलीला कारण असलेल्या लोकांकडूनच नुकसान भरपाई वसूल करण्यात येईल. डी. जे. हळ्ळी आणि के. जी. हळ्ळी दंगल हा पूर्वनियोजित कट होता. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलिसांनी अखेरचा उपाय म्हणून गोळीबार केला. या घटनेत तीन जण ठार झाले. दगडफेक सुरू असताना पोलिसही जखमी झाले. खबरदारीचा उपाय म्हणून घटनेच्या ठिकाणी यापूर्वीच आणखी पोलिस तैनात करण्यात आले आहेत.'
केंद्रीय गृह सचिवांशी आपण सतत संपर्कात असल्याचे बोम्माई यांनी सांगितले. घटनेच्या ठिकाणी गरुड पथक आधीच कार्यरत आहे. चेन्नई आणि हैदराबादहून आणखी तीन केएसआरपी कंपन्या येत आहेत. याव्यतिरिक्त, जलद कृती दलही लवकरच घटनास्थळी पोहचणार आहे. सोशल नेटवर्किंगवर चर्चा करून स्थानिकांनी हे कृत्य करण्याचा कट रचला आहे. हा पूर्वनियोजित कट होता, असा गंभीर आरोप केला. दरम्यान, मंगळवारच्या रात्रीच्या दंगलीनंतर सध्या बंगळूर नियंत्रणाखाली आहे. शहरातील डी.जे.हळ्ळी व के.जी. हळ्ळी पोलिस ठाण्याच्या कक्षेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या दंगलीत सामील झालेल्या 110 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या वाहनासह 50 हून अधिक वाहनांचे नुकसान झाले. आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांच्यासह बहीण जयंतीच्या घराला हल्लेखोरांच्या गटाने आग लावली असल्याचे मंत्री बोम्मई म्हणाले.

हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर सरकार कारवाई करेल. हिंसाचाराचा अवलंब करणे, वाहने जाळणे कायद्याच्या विरोधात असून कोणत्याही समस्येवर हा तोडगा नाही. कोणत्याही विषयाचा कायदेशीर पाठपुरावा केला जाऊ शकतो आणि तार्किक अंमलबजावणी केली जाऊ शकते. पोलिस आयुक्तांना घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
- बसवराज बोम्मई, गृहमंत्री

के. जी. हळ्ळी आणि डी. जे. हळ्ळी येथे परिस्थिती नियंत्रणात आहे. जमावाने रात्री 8 वाजेपर्यंत एकत्र जमून गोंधळ घालण्यास सुरवात केली होती. पण ही बाब उशिरा निदर्शनास आली. घटनेच्या ठिकाणी जाण्यासाठी दीड किलोमीटरपेक्षा जास्त चालत जावे लागले.
- कमल पंत, पोलिस आयुक्त बंगळूर
 

संपादन- अवित बगळे

संबंधित बातम्या