विकास दुबेवर ६१ गुन्हे दाखल

PTI
रविवार, 12 जुलै 2020

पोलिसांच्या नोंदीतील माहिती; खुनाचे आठ गुन्हे

कानपूर/लखनौ

पोलिस चकमकीत ठार झालेला कुख्यात गुंड विकास दुबे याच्यावर ६१ गुन्हे दाखल होते. त्यात आठ गुन्हे खुनाचे होते. त्याने १५ लोकांचे खून केले होते.
दुबेवर शेवटचा खुनाचा गुन्हा गेल्या आठवड्यात दाखल झाला आहे. कानपूरमधील बिकरु गावात त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर बेछूट गोळीबार करीत आठ जणांची हत्या केली होती. यावरुन त्याच्यावर खुनाचा आठवा गुन्हा नोंदविण्यात आला होता. अन्य सात गुन्हे हे १९९२ ते २०१७ मध्ये नोंदविण्यात आले होते, असे पोलिसांच्या नोंदीत नमूद केले आहे. गुन्हेगारी विश्‍वात दुबेचा १९९०पासून तीन दशके दबदबा होता. त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचे नऊ गुन्हे व अमली पदार्थ व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम कायद्याखाली (एनडीपीएस) दोन, गुंडगिरी व समाज विघातक कारवाई (प्रतिबंधक) कायद्यानुसार सात, गुंडगिरी कायद्याखाली सहा आणि शस्त्रास्त्र कायद्यानुसार तीन यांसह अनेक इतर गुन्हे दाखल झाले आहेत.

दुबेवरील गुन्हे
- एकूण ६१ गुन्ह्यांमधील ८० टक्के गुन्हे गुन्हेगारी करिअरच्या पहिल्या टप्प्यातच दाखल
- शांततेचा भंग करणे आणि गंभीर दुखापत केल्यावरून १९९०मध्ये पहिला गुन्हा
- वयाच्या तिशीत राष्ट्रीय सुरक्षा कायदा २००१ खाली गुन्हा दाखल
- १९९० ते २००५ या काळात ६१ पैकी ४८ गुन्ह्यांची नोंद
- २००६ ते २०२० एकूण २० गुन्हे
- खुनाचा पहिला गुन्हा १९९२ मध्ये दाखल

संपादन- अवित बगळे

 

 

संबंधित बातम्या