कर्नाटकात एकाच दिवसात 99 पॉझिटिव्ह

Dainik Gomantak
मंगळवार, 19 मे 2020

बहुसंख्य रुग्ण मुंबईहून परतलेले

बंगळूर

राज्यात सोमवारी (ता. 18) एकाच दिवसात 99 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे राज्य हादरले असून आरोग्य तसेच प्रशासकीय यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. या पॉझिटिव्ह रुग्णांपैकी बहुसंख्य जण मुंबईहून परतले आहेत. दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 1,246 वर पोचली आहे.
राज्यात आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण सोमवारी सापडले आहेत. सकाळी 84 तर सायंकाळी 15 नवे रुग्ण आढळले असून राज्यात कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. मंड्या जिल्ह्यात 17 तर बंगळूरमध्ये 24 नवे कोरोनाबाधित आढळून आले. याबरोबरच हासनमध्ये 4, रायचूरमध्ये 6, कोप्पळमध्ये 3, विजापूर, यादगिरी व गदग जिल्ह्यात प्रत्येकी 5,  म्हैसूर, बळ्ळारी, दावणगेरी, मंगळूर व कोडगू जिल्ह्यात प्रत्येकी 1,  गुलबर्गा, कारवारमध्ये प्रत्येकी 10, बेळगाव जिल्ह्यात 2 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. कारवार जिल्ह्यातील 2 वर्षाचे मूल तर मंड्यात 3 वर्षाची मुलगी कोरोनाबाधित झाली आहे.
बंगळूरमधील 24  पैकी 16 रुग्ण घरकाम करणाऱ्याच्या संपर्कात आले होते. येथीलच इतर दोन रुग्ण अनुक्रमे नेलमंगल आणि चेन्नईच्या दबासपेठ येथून प्रवास करुन आले होते. मंड्यामधील सर्व 17 कोरोनाबाधित मुंबईहून आले होते. विजापूर, यादगीरमधील प्रत्येकी 5 तर हासनमधील चार रुग्णांना मुंबई प्रवासाचा इतिहास आहेत. कोप्पळमधील रुग्णांनी अनुक्रमे मुंबई, रायगड व चेन्नईचा प्रवास केला होता. बिदरमधील रुग्णाचा पूर्वीच्या रुग्णाशी संपर्क होता. दावणगेरीच्या रुग्णाचा महाराष्ट्रातील सोलापूरच्या प्रवासाचा इतिहास आहे. म्हैसूरच्या रुग्णाचाही मुंबईच्या प्रवासाचा इतिहास आहे. दोन दिवसापूर्वीच म्हैसूरला कोरोनामुक्त म्हणून घोषित करण्यात आले होते; पण सोमवारी पुन्हा एक रुग्ण आढळला आहे.

संबंधित बातम्या