आंदोलक शेतकऱ्यांसाठी आम आदमी पक्षाकडून मोफत 'वाय-फाय' सुविधा

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 29 डिसेंबर 2020

आंदोलनासाठी ठाण मांडून बसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आपने मोफत वाय-फाय उपलब्ध करून दिले आहे. पक्षाचे नेते राघव चढ्ढा यांनी ही घोषणा करताना पक्ष सिंधू सीमेवर वाय-फाय हॉटस्पॉट लावणार असल्याचे माहिती दिली. 

नवी दिल्ली- दिल्लीच्या सीमांवर बसून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आम आदमी पक्षाने मोठी घोषणा केली आहे. आंदोलनासाठी ठाण मांडून बसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आपने मोफत वाय-फाय उपलब्ध करून दिले आहे. पक्षाचे नेते राघव चढ्ढा यांनी ही घोषणा करताना पक्ष सिंधू सीमेवर वाय-फाय हॉटस्पॉट लावणार असल्याचे माहिती दिली. 

याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, 'इंटरनेट सुविधेत अडचणी येत असल्याने कुटुंबासोबत व्हिडिओ कॉलिंगवर बोलता येत नसल्याची आंदोलक शेतकऱ्यांची तक्रार होती. त्यामुळे मुख्यमंत्री  अरविंद केजरीवाल यांच्याकडून हा निर्णय घेण्यात आला. लोकांना सन्मानाने जीवन जगण्यासाठी अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याची गरज असते. मात्र, आता त्यात इंटरनेटही जोडले गेले आहे. गरजेनुसार तेथे हॉटस्पॉट लावण्यात येतील. एका हॉटस्पॉटचे १०० मीटरच्या अंतर्गत सिग्नल मिळतील.' ही सुविधा आम आदमी पक्षाकडून  उपलब्ध करण्यात येणार असल्याचेही यावेळी राघव चढ्ढा यांनी आवर्जून सांगितले. 

दिल्लीच्या सीमांवर महिन्याभरापेक्षा जास्त दिवस होऊनही शेतकऱ्यांच्या आंदोलनाची तीव्रता कमी झालेली नाही. ती वाढतच जात आहे. या शेतकऱ्यांना मात्र, पोलिस दिल्लीत प्रवेश करू देत नाही. मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही दोनदा तेथे जाऊन शेतकऱ्यांशी हितगुज करून आलेले आहेत. शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या प्रयोजनाचे निरीक्षण करण्यासाठीच केजरीवाल हे येत होते असेही बोलले जात होते. कारण त्यानंतर केजरीवाल यांनी शेतकऱ्यांसाठी पाणी आणि शौचालयांसाची व्यवस्था करण्याचेही आदेश दिले होते. 

संबंधित बातम्या