सीरमची आग आटोक्यात येताच आदर पुनावाला यांनी दिली प्रतिक्रिया  

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 21 जानेवारी 2021

कोरोनाची लस तयार होत असलेल्या सीरम इन्स्टिट्यूटला भीषण आग लागली होती. त्यामुळे या घटनेने देशासह संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र आता ही आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले असल्याची माहिती मिळाली आहे.

कोरोनाची लस तयार होत असलेल्या सीरम इन्स्टिट्यूटला भीषण आग लागली होती. त्यामुळे या घटनेने देशासह संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र आता ही आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले असल्याची माहिती मिळाली आहे. आज दुपारी सव्वा दोन वाजताच्या सुमारास आग लागल्यानंतर आता जवळपास साडे तीन ते चार तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आले. त्यानंतर सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांनी ट्विट करत, सर्वांनी दाखवलेली काळजी आणि प्रार्थनांसाठी आभार मानले आहेत. 

सीरम इन्स्टिट्यूट ही लस निर्मिती करणाऱ्या सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. आणि या कंपनीतील इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली होती. नंतर ही आग वाढत जाऊन तिसऱ्या व चौथ्या मजल्यापर्यंत पोहचली होती. बीसीजी लस तयार करण्यात येणाऱ्या ठिकाणी ही आग पसरली होती. या घटनेची माहिती मिळताच सुरुवातीला अग्निशामक दलाच्या मध्यवर्ती केंद्रतील 2 गाड्या तसेच कोंढवा व हडपसर केंद्राच्या 2 अशा चार गाड्या घटनास्थली रवाना झाल्या होत्या. त्यानंतर आतापर्यंत 10 गाड्या व एक ब्रांटो व्हेईकल अशा एकूण 11 अग्निशमन गाड्या या ठिकाणी पाठवण्यात आल्या होत्या. व त्यांनी ही आग आटोक्यात आणली असून, यानंतर सीरमचे चेअरमन आणि सीईओ आदर पुनावाला यांनी सोशल मीडियावरील ट्विटरच्या माध्यमातून सर्वांचे आभार मानले आहेत. 

आदर पुनावाला यांनी केलेल्या ट्विट मध्ये, या प्रसंगी सर्वांकडून दाखवण्यात आलेली काळजी व प्रार्थना यासाठी आभारी असल्याचे म्हटले आहे. याशिवाय या दुर्घटनेत कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाली नसल्याची महत्वाची गोष्ट असल्याचे आदर पुनावाला यांनी आपल्या ट्विट मध्ये लिहिले आहे. तसेच आग विझवण्यात मोठी कामगिरी बजावणाऱ्या अग्निशामक दल आणि पुणे पोलिसांचे देखील आभार आदर पुनावाला यांनी या ट्विट मध्ये मानले. 

दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूटच्या बीसीजी लसीचे उत्पादन सुरु असलेल्या इमारतीला आग लागली होती. तर कोरोना प्रतिबंधक लस SEZ 3 या बिल्डिंग मध्ये तयार होते त्या बिल्डिंगला आगीची झळ बसली नसल्याची माहिती सीरम इन्स्टिट्यूटने दिली आहे. तर अ‍ॅस्ट्राझेनका व ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने विकसित केलेली कोरोनावरील कोविशिल्ड लस सीरम इन्स्टिट्यूट उत्पादित करत आहे.    
  

संबंधित बातम्या