सीरम इन्स्टिट्यूट मधील कोरोनाची 'कोविशिल्ड' लस सुरक्षित 

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 21 जानेवारी 2021

कोरोनाची लस तयार होत असलेल्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागल्याच्या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. कोरोनासह इतर लस निर्मिती करणाऱ्या सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी सीरम इन्स्टिट्यूट ही एक आहे.

पुणे - कोरोनाची लस तयार होत असलेल्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागल्याच्या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. कोरोनासह इतर लस निर्मिती करणाऱ्या सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी सीरम इन्स्टिट्यूट ही एक आहे. आणि याच कंपनीत सध्या अ‍ॅस्ट्राझेनका व ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने विकसित केलेली कोरोनावरील कोविशिल्ड लस तयार होत आहे. मात्र जिथं आग लागली आहे तिथं बीसीजी लस तयार करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.

सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली आहे. भीषण अशी ही आग लागली असून धुराचे लोट आकाशात पसरले आहेत. सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीनंतर घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. सीरम इन्सिट्यूटच्या मांजरी परिसरातील एका इमारतीस गुरुवारी दुपारी सव्वा दोन वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. 

या घटनेची माहिती मिळताच सुरुवातीला अग्निशामक दलाच्या मध्यवर्ती केंद्रतील 2 गाड्या तसेच कोंढवा व हडपसर केंद्राच्या 2 अशा चार गाड्या घटनास्थली रवाना झाल्या होत्या. त्यानंतर आतापर्यंत 10 गाड्या व एक ब्रांटो व्हेईकल अशा एकूण 11 अग्निशमन गाड्या गेल्या आहेत.

बीसीजी लसीचं उत्पादन सुरु असलेल्या इमारतीला आग लागली आहे. तर कोरोना प्रतिबंधक लस SEZ 3 या बिल्डिंग मध्ये तयार होते त्या बिल्डिंगला आगीची झळ नाही अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूटने दिली आहे.

इमारतीमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात येत आहे. चौघेजण यामध्ये अडकले होते त्यापैकी तिघांना बाहेर काढलं असून एकजण अद्याप आत असल्याचं सांगितलं जात आहे. अग्नीशमन दल आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे.

संबंधित बातम्या