भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारण्याच्या वाटेवर? 

भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारण्याच्या वाटेवर? 
India and Pakistan

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे संबंध चांगलेच ताणले गेले होते. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने केलेल्या एयर स्ट्राईक नंतर दोन्ही देशांमधील सर्व प्रकारची चर्चा थांबली होती. मात्र त्यानंतर आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध पुन्हा सुरळीत होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कारण दोन्ही देशांच्या सीमेवरील पुंछ-रावळकोट क्रॉसिंग पॉईंटवर आज भारत आणि पाकिस्तान सैन्यात ब्रिगेड कमांडर स्तरावरील फ्लॅग मिटिंग पार पडली आहे. (After two and a half years a flag meeting was held between India and Pakistan) 

पुलवामाच्या घटनेनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध चांगलेच दुरावले गेले होते. मात्र त्यानंतर 25 फेब्रुवारीला हॉटलाईनवर दोन्ही देशांच्या सैन्य ऑपरेशनचे महानिर्देशक यांची चर्चा झाली होती. यावेळी भारत-पाकिस्तान सीमेवर युद्धबंदीच्या नियमाचे उल्लंघन केले जाणार नाही असा निर्णय घेण्यात आला होता. व या निर्णयानंतर दोन्ही देशांच्या तोफा थंडावल्या होत्या. याशिवाय, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना लवकर बरे होण्याच्या शुभेच्छाही दिल्या होत्या. तर 23 आणि 24 मार्च रोजी दोन्ही देशांमध्ये सिंधू जल करारावर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर आता भारत आणि पाकिस्तान यांच्या सैन्यात सीमारेषेवरील अंमलबजावणी यंत्रणेवर चर्चा करण्यासाठी ब्रिगेड कमांडर स्तरावरील अधिकाऱ्यांची फ्लॅग मिटिंग पार पडली आहे. 

याशिवाय, येत्या 30 मार्च रोजी ताजिकिस्तानची राजधानी दुशान्बे येथे हार्ट एशिया परिषद होणार आहे. यात परिषदेत भारताचे (India) परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि पाकिस्तानचे (Pakistan) परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी सहभागी होणार आहेत. त्यामुळे या परिषदेत दोन्ही नेत्यांमध्ये बैठक होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे तब्बल अडीच वर्षांनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध पुन्हा पूर्ववत होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.      

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com