राज्यसभेत कागदांची फाडाफाडी अन् धक्काबुक्की; गदारोळात कृषी विधेयके मंजूर

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज कृषी उत्पादन व्यापार व वाणिज्य (संवर्धन-सुलभीकरण) २०२० आणि शेतकरी (सशक्तीकरण व संरक्षण) किमतीबाबत आश्‍वासन व ‘कृषी सेवा करार विधेयक २०२०’ आज सादर केली.

नवी दिल्ली: गगनभेदी घोषणा, धक्काबुक्की, अध्यक्षांच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत उतरलेले विरोधी पक्षांचे सदस्य, कागदपत्रांची फाडाफाडी व पुस्तके उपसभापतींच्या अंगावर फेकून मारणे, सामाजिक अंतरभान न पाळता अत्यंत दाटीवाटीने उभ्या असलेल्या सुमारे ६० मार्शलची सभागृहातील तैनाती, त्यांच्यासह महिला सुरक्षा रक्षकांनी सभापतींच्या आसनाला केलेले कडे, काही विरोधी नेत्यांची उपसभापतींबरोबर झालेली शारीरिक झटापट, सभापतींच्या आसनासमोरील माईक तोडण्याचा प्रयत्न, सरचिटणीसांच्या टेबलवर चढून दिलेल्या घोषणा व त्या देणाऱ्या खासदारांना ८-१० मार्शलनी अक्षरशः उचलून खाली उतरणे या अतिशय अभूतपूर्व गोंधळात कृषी क्षेत्रातील सुधारणाविषयक दोन विधेयके राज्यसभेत आज आवाजी मतदानाने मंजूर झाली.

प्रचंड संख्येने मार्शलना तैनात करून राज्यसभेत विधेयक मंजूर करवून घेण्याचा महिला आरक्षण विधेयकानंतरचा हा पहिला प्रसंग ठरला. 

केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज कृषी उत्पादन व्यापार व वाणिज्य (संवर्धन-सुलभीकरण) २०२० आणि शेतकरी (सशक्तीकरण व संरक्षण) किमतीबाबत आश्‍वासन व ‘कृषी सेवा करार विधेयक २०२०’ आज सादर केली. त्यावर साडेतीन तासांची चर्चाही झाली. मात्र विधेयके मंजूर करण्याची वेळ आली तेव्हा कामकाजाची वेळ वाढवण्यास कॉँग्रेससह विरोधकांनी तीव्र विरोध केला. विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद म्हणाले की जेव्हा सभागृहाची वेळ वाढवायची असते तेव्हा संसदीय परंपरेप्रमाणे संख्येच्या नव्हे तर, सर्वसहमतीच्या आधारे ती वाढवावी लागते. विरोधी पक्षांचा याला एकमुखी विरोध असल्याने सरकारने उद्या विधेयकांना मंजुरी घ्यावी. मात्र सरकारकडून याला तीव्र विरोध झाला. 

उपसभापतींशी झटापट
तोमर यांनी आपले उत्तराचे भाषण पुढे सुरू ठेवल्याने आणि संतापलेल्या कॉँग्रेस, तृणमूल कॉँग्रेस, आम आदमी पक्ष व बहुतांश विरोधी पक्षांचे सदस्य घोषणा देत सभापतींच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत उतरले. उपसभापती हरिवंश यांनी विधेयकांना मंजुरी घेण्यास सुरवात करताच गोंधळ अधिक वाढला. कॉँग्रेसचे जयराम रमेश व तृणमूलचे डेरेक ओब्रायन हे हरिवंश यांच्याजवळ जाऊन जोरजोरात वाद घालू लागले. ‘‘तुम्ही हे काय चालविले आहे?,’’ असे म्हणत ओब्रायन यांनी हरिवंश यांच्याशी शारीरिक झटापट केली तर, माकपचे एल्लमारम करीम यांनी त्यांच्यासमोरील माईक तोडण्याचा प्रयत्न केला. डोला सेन, संजय सिंह, राजीव सातव आदींनी विधेयक व अन्य कागदपत्रे फाडून त्यांचे तुकडे हवेत भिरकावले. रिपून बोरा यांनी राज्यसभा महासचिवांजवळ ठेवलेल्या नियमपुस्तिका व इतर पुस्तके हरिवंश यांच्या दिशेने फेकली. त्याच वेळी सभागृहातील मार्शल धावले आणि त्यांनी उपसभापतींभोवती कडे केले. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावरही गदारोळ सुरू राहिला. हरिवंश यांनी विधेयकांना मंजुरीची प्रक्रिया सुरू करताच पुन्हा गोंधळ झाला. संजय सिंह, सातव महासचिवांच्या टेबलवर उभे राहिले त्यांना मार्शलनी अक्षरशः उचलून खाली उतरविले. 

हरिवंश यांच्याविरुद्ध ‘अविश्‍वास’?
राज्यसभेत आज झालेल्या अभूतपूर्व गदारोळानंतर कॉँग्रेससह विरोधी पक्षांनी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह ऊर्फ हरिवंश यांच्याविरुद्ध अविश्‍वास प्रस्ताव आणण्याचे ठरविले आहे.

सुरक्षारक्षकांचे कडे
‘मोदी शरम करो’, ‘किसानविरोधी मोदी सरकार हाय हाय’ अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेले. या सर्वात दुपारी सव्वा वाजता सभागृह १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. कामकाज पुन्हा सुरू होण्याआधी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राज्यसभा सुरक्षा अधीक्षकांना बोलावून उपसभापती व महासचिवांच्या टेबलाभोवती मार्शलचे कडे करण्याची सूचना केली. त्यानंतर लॉबी, सभागृहाचे आवार आदींमध्ये तैनात असलेल्या ७ महिला सुरक्षा रक्षकांसह सुमारे ५५ ते ६० मार्शल सभागृहात आले. त्यांनी सभापतींच्या आसनाभोवती संपूर्ण कडे केले. महिला सुरक्षा रक्षकांना पुढे उभे करण्यात आले. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या