सुशांतसिंह राजपूत याची आत्महत्याच

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 4 ऑक्टोबर 2020

सुशांतचा मृत्यू हा गळफास घेऊन झाला असल्याचा निष्कर्ष एम्सच्या वैद्यकीय मंडळाने काढला आहे. सुशांतचा मृत्यू विष देऊन आणि गळा दाबून झाल्याचा दावा संस्थेच्या सहा न्यायवैद्यक डॉक्टरांच्या चमूने नाकारला आहे. त्यांनी तसे न्यायवैद्यक मत (मेडिको लीगल) मत सीबीआयला  सादर  केले आहे.

नवी दिल्ली- अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूच्या चौकशीचा अहवाल काल जाहीर करण्यात आला. सुशांतचा मृत्यू हा गळफास घेऊन झाला असल्याचा निष्कर्ष एम्सच्या वैद्यकीय मंडळाने काढला आहे. सुशांतचा मृत्यू विष देऊन आणि गळा दाबून झाल्याचा दावा संस्थेच्या सहा न्यायवैद्यक डॉक्टरांच्या चमूने नाकारला आहे. त्यांनी तसे न्यायवैद्यक मत (मेडिको लीगल) मत सीबीआयला  सादर  केले आहे.

'हे प्रकरण गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आहे. आमचा तसा अहवाल आम्ही सीबीआयला सादर केला आहे.' असे एम्सच्या न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी सांगितले.  
 सुशांतच्या शरीरावर गळफास व्यतिरिक्त कुठलीच जखम आढळून आली नाही. शिवाय काही झटापट झाली होती का, असेही काही सापडले नाही, असेही यावेळी गुप्ता यांनी बोलताना सांगितले. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने पुढे अधिक माहिती देण्याचे मात्र त्यांनी आवर्जून टाळले. 

जून महिन्याच्या 14 तारखेला सुशांतने मुंबईच्या वांद्रे भागातील त्याच्या अपार्टमेंटमध्ये आत्महत्या केली होती. मात्र, यानंतर सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी पाटणा येथे रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबावर त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचे आरोप करत तक्रार दाखल केली होती. यानंतर बिहार पोलिसांकडून सीबीआयकडे हे प्रकरण सोपवण्यात आले होते. 
दरम्यान, सुशांतच्या मृत्यू प्रकरणात आपण कोणत्याही निष्कर्षापर्यंत आलेलो नसून याबाबत अजून तपास  सुरूच आहे, असे या आठवड्याच्या सुरूवातीला सीबीआयने सांगितले होते.      

संबंधित बातम्या