अमेरिकेतील उद्योगधंदे दिवाळखोरीकडे...

Dainik Gomantak
शुक्रवार, 19 जून 2020

‘कोविड-१९’चा खरा परिणाम या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत जाणवेल, असे सांगितले जाते.

वॉशिंग्टन

कोरोनाच्या झळा जगभरातील उद्योगधंद्यांना बसू लागल्या असून, बलाढ्य अर्थव्यवस्था समजल्या जाणाऱ्या अमेरिकेतील अनेक उद्योग आता दिवाळखोरीकडे झुकले आहेत. आर्थिक व्यवहार थंडावल्याने अनेक उद्योगधंद्यांवर विपरित परिणाम झाला. मागणीच नसल्याने अर्थचक्राला खीळ बसली आणि विविध क्षेत्रांतील कंपन्या अडचणीत आल्या आहेत.

बेरोजगारीचे सावट मोठे
‘कोविड-१९’चा खरा परिणाम या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत जाणवेल, असे सांगितले जाते. अमेरिकेतील बेरोजगारीचा दर आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर पोचला आहे. बेरोजगारीचे प्रमाण २५ टक्‍क्‍यांच्या वर गेले आहे. कार्यरत असलेल्या १६ कोटी लोकसंख्येपैकी जवळजवळ ४० टक्के लोकांवर बेरोजगारीचे संकट कोसळलेले आहे. उत्पन्नच थांबल्याने ग्राहकांकडून एरवी येणारी मागणी घसरत चालली आहे. त्यातच तारण किंवा गहाणखत कर्जाचे हप्ते, वाहन कर्जाचे हप्ते आणि क्रेडिट कार्डाची देणी थकत चालल्याने आर्थिक संकट गहिरे होत चालले आहे. यामुळे अमेरिकेतील अर्थव्यवस्था मंदीच्या गर्तेत अडकत जाणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

संकट अधिक गंभीर
सुमारे एका तपापूर्वी म्हणजे २००८ मध्येही अमेरिकेवर मंदीचे संकट कोसळले होते. त्याचा परिणाम जगभरातील अर्थव्यवस्थांवर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या झाला होता; पण कोरोनाचे संकट हे त्यापेक्षाही गंभीर ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

कोणाकोणाला फटका?
अमेरिकेतील विविध क्षेत्रांतील उद्योगांचा प्रवास दिवाळखोरीकडे सुरू झाला असून, त्यापैकी काही कंपन्या ...
- निस्सान मोटार कंपनी अमेरिकेतील युनिट बंद करण्याची शक्‍यता.
- ‘हर्टझ’ या मोटार भाड्याने देणाऱ्या सर्वांत मोठ्या कंपनीचा दिवाळखोरीसाठी अर्ज सादर
- ‘कॉमकार’ या सर्वांत मोठ्या ट्रक कंपनीचा दिवाळखोरीसाठी अर्ज सादर. त्यांच्याकडे ४ हजार ट्रक आहेत.
-़़‘जेसी पेनी’ या जुन्या रिटेल कंपनीचा दिवाळखोरीसाठी अर्ज सादर
- जगप्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरन बफे यांना गेल्या दोन महिन्यांत ५० अब्ज डॉलरचा फटका
- जागतिक अर्थव्यवस्थेत मोठ्या उलथापालथीचा ‘ब्लॅकरॉक’ या जगातील एका मोठ्या गुंतवणूक कंपनीचा अंदाज. ही कंपनी ७ ट्रिलियन डॉलरहून अधिक निधीचे व्यवस्थापन करते.
- अमेरिकेतील सर्वांत मोठा मॉल असलेल्या मॉल ऑफ अमेरिकाने तारण किंवा गहाणखत कर्जाचे हप्ते थांबविले.
- यंदाच्या वर्षी अंदाजे १२ हजार ते १५ हजार रिटेल स्टोअर बंद केले जातील. जे क्रु, गॅप, व्हिक्‍टोरिया सिक्रेट, बाथ अँड बॉडी वर्कस्‌, फॉरेव्हर २१, गेमस्टॉप, वॉलग्रीन्स, बोस, डेस्टिनेशन मॅटर्निटी, मॉडेल्स, आर्ट व्हॅन फर्निचर, ऑलिंपिया स्पोर्टस, केमार्ट, स्पेशालिटी कॅफे अँड बेकरी आदी अनेक मोठ्या ब्रॅंड्‌सनी आपापली स्टोअर बंद करण्याची घोषणा केली आहे.
 

संबंधित बातम्या