West Bengal Election: भाजपा कार्यकर्त्याच्या आईच्या मृत्यूवरून अमित शहा तृणमुलवर भडकले 
West Bengal

West Bengal Election: भाजपा कार्यकर्त्याच्या आईच्या मृत्यूवरून अमित शहा तृणमुलवर भडकले 

काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणामध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या 85 वर्षाच्या आईला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. मारहाण केल्यानंतर भाजपा कार्यकर्त्याच्या आईची प्रकृती खालावली होती. त्यानंतर आता त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असुन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. याशिवाय अमित शहा यांनी या प्रकरणावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला चढवला आहे. (Amit Shah criticized the Trinamool Congress over the death of the BJP workers mother)

ही घटना जवळ-जवळ महिनाभरापूर्वीची आहे. आणि त्यावेळेस टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप भाजपने केला होता. यानंतर भाजपा कार्यकर्त्याच्या आईचा मृत्यू झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज त्यांना श्रद्धांजली वाहिली. याशिवाय ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करताना अमित शहा यांनी या घटनेच्या वेदना आणि जखमा ममता बॅनर्जी यांना बराच काळ त्रास देणार असल्याचे म्हटले. तसेच बंगाल महिलांसाठी हिंसा मुक्त आणि सुरक्षित समाजासाठी लढा देईल, असे त्यांनी पुढे म्हटले आहे. 

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) 27 फेब्रुवारी रोजी निमटा भागात भाजप कार्यकर्ते गोपाल मजुमदार यांच्यावर हल्ला अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला होता. यानंतर गोपाल मजुमदार यांच्या आईने तृणमूल काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला व आपल्या मुलाला मारहाण केले असल्याचा आरोप केला होता. यानंतर स्थानिक पोलिसांनी त्यांचा हा आरोप फेटाळत, त्यांना मारहाण झाली नसल्याचे स्पष्ट करत त्या आजारी असल्याचे सांगितले होते. तसेच या प्रकरणाचा तपास केला जात असून या घटनेत जबाबदार असलेल्या लोकांची अद्याप ओळख पटलेली नसल्याचे स्थानिक पोलिसांनी म्हटले होते. 

तर, टीएमसीचे (TMC) खासदार सौगाता रॉय यांनी या महिलेच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले असून, मात्र त्यांनी या घटनेचा आणि तृणमूल काँग्रेस पक्षाचा संबंध नसल्याचे म्हटले आहे. याशिवाय सौगाता रॉय यांनी या महिलेच्या मृत्यूबद्दल बोलताना त्याचा गोपाल आणि टीएमसी कार्यकर्ते यांच्यात झालेल्या भांडणाशी जरा सुद्धा संबंध नसल्याचे सांगत, भाजपने केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.        

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com