Assam Election : ''आगामी पाच वर्षात आसामला घुसखोरीपासून मुक्त करू'' 

Amit Shaha
Amit Shaha

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या आसामच्या निवडणूक दौर्‍यावर आहेत. अमित शहा यांनी राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिनसुकिया येथील जाहीर सभेत बोलताना, आम्ही जे बोलतो तेच करत असल्याचे सांगितले. तसेच यावेळी त्यांनी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवाय मागील पाच वर्षात आसाममध्ये कोणतेही आंदोलन किंवा दहशतवाद नसल्याचे अमित शहा यांनी यावेळी म्हटले आहे. आसाम मध्ये मागील पाच वर्षात भारतीय जनता पक्षाच्या सत्तेत राज्यात शांततेत विकास होत असल्याचे म्हणत, पुढील पाच वर्षात आसाम मध्ये होत असलेली घुसखोरी पूर्णपणे थांबविण्यात येणार असल्याचे अमित शहा यांनी सांगितले.    

राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिनसुकिया येथील जाहीर सभेत बोलताना, आसामला घुसखोरांपासून मुक्त करण्याचे काम जवळजवळ पूर्ण झाले असल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे. याशिवाय मागील निवडणुकीच्या वेळी आसामला दहशतवादापासून मुक्त करण्याचे आश्वासन दिले होते आणि ते पूर्ण केल्याचे अमित शहा यावेळेस म्हणाले. तसेच मागील पाच वर्षात 2000 हून अधिक जण शस्त्रे सोडून मुख्य प्रवाहात आल्याची माहिती अमित शहा यांनी दिली. त्यामुळे भाजपला अजून पुढील पाच वर्षे दिली तर, आसाममधील घुसखोरी हा नेहमीचा प्रश्न इतिहासात जमा करणार असल्याचे आश्वासन अमित शहा यांनी यावेळी दिले. 

याव्यतिरिक्त, मागील पाच वर्षात सर्वानंद सोनोवाल यांनी राज्यात असे सरकार चालवले आहे ज्यामुळे पाच वर्षे विरोधी पक्ष भ्रष्टाचाराचा आरोप करू शकत नसल्याचे अमित शहा म्हणाले. तसेच, आगामी विधानसभा निवडणुकीत आसामच्या लोकांकडे दोन पर्याय असल्याचे अमित शहा यांनी नमूद केले. एक पर्याय म्हणजे सर्वानंद सोनोवाल यांच्या अध्यक्षतेखालील भाजप आणि आसाम गण परिषद यांचा तर, दुसरा राहुल गांधी आणि बद्रुद्दीन अजमल यांच्या नेतृत्वाखालील असल्याचे अमित शहा यांनी सांगितले. व यावर त्यांनी काही प्रश्न देखील उपस्थित केले. बद्रुद्दीन अजमलचा पाठिंबा घेतलेले राहुल गांधी आसामला घुसखोरीपासून वाचवू शकतील काय? आसाम बद्रुद्दीन यांच्या बरोबर सुरक्षित आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी केला. 

यानंतर, काँग्रेस पक्ष हा घुसखोरांकडे मते मिळविण्याचे साधन म्हणून पाहत असल्याची टीका अमित शहा यांनी केली. याशिवाय, ज्यांनी देशाचे विभाजन केले त्यांच्यासोबतच केरळमध्ये मुस्लीम लीगबरोबर काँग्रेसने भागीदारी केल्याचे अमित शहा म्हणाले. तर बंगालमध्ये ते फुरफुरा शरीफ आणि आसाम मध्ये बद्रुद्दीन अजमल यांच्यासोबत भागीदारी केल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे. व हे पक्ष जिंकण्यासाठी कोणत्याही खालच्या पातळीवर जाऊ शकतात, असे ते पुढे म्हणाले. मात्र भाजप व्होट-बँक राजकारण करत नसल्याचे अमित शहा यांनी सांगत, पुढील पाच वर्षात राज्यातील घुसखोरीचा प्रश्न सोडवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.     

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com