रँचोच्या 'सोलर हिटेड मिलिट्री टेन्ट'वर आनंद महिंद्रा फिदा; केले ट्विट  

रँचोच्या 'सोलर हिटेड मिलिट्री टेन्ट'वर आनंद महिंद्रा फिदा; केले ट्विट  
Anand Mahindra and Solar Tent

भारत आणि चीन यांच्यातील सैन्यात मागील वर्षाच्या जून महिन्यात गलवान भागात मोठा संघर्ष झाला होता. आणि त्यानंतर दोन्ही देशांचे संबंध चांगलेच तणावपूर्ण झाले होते. मात्र आता लडाखच्या भागात भारत आणि चीन यांच्यातील हा तणाव हळू-हळू निवळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याशिवाय लडाखच्या गलवान भागातून अजून एक दिलासादायक बातमी मिळाली होती. आणि ती म्हणजे लडाख मधील सोनम वांगचुक यांनी सैन्याच्या जवानांसाठी एक टेन्ट तयार केला आहे. जो उणे तापमानात देखील उबदार राहील. 

लडाखच्या भागात हिवाळ्यात पारा खूपच खाली जातो. आणि देशाच्या सुरक्षेसाठी या प्रतिकूल परिस्थितीतही भारतीय लष्कराचे सैनिक सीमेच्या रक्षणासाठी येथे रात्रंदिवस उभे असतात. व भविष्यात लष्कराच्या सैनिकांना थंडीमुळे कोणतीही अडचण येऊ नये म्हणून सोनम वांगचुक यांनी एक नवे संशोधन केले आहे. थ्री इडियट्स या सिनेमात आमिर खानने ज्यांची भूमिका बजावली त्या रियल लाईफ मधील सोनम वांगचुक यांनी आता भारतीय सैन्यासाठी नवीन टेन्टची निर्मिती केली आहे. सोनम वांगचुक यांनी बनवलेल्या या टेन्टची खासियत म्हणजे बाहेर उणे 20 अंश सेल्सिअस तापमान असले तरी, टेन्टच्या आतील तापमान नेहमीच 15 ते 20 डिग्री सेल्सियस राहणार आहे. 

सोनम वांगचुक हे त्यांच्या संशोधनासाठी ओळखले जातात. आणि यावेळेस त्यांनी सीमेवरील सुरक्षेत तैनातीसाठी असलेल्या जवानांचा थंडीपासून बचाव होण्यासाठी नवीन तंत्रज्ञान असलेल्या टेन्टची निर्मिती केली आहे. सोनम वांगचुक यांनी याबद्दल सोशल मीडियावरील ट्विटरवर पोस्ट शेअर केली असून, यात ते स्वतः टेन्टसंबंधित माहिती देत आहेत. तसेच सोनम वांगचुक यांनी या टेन्टला 'सोलर हिटेड मिलिट्री टेन्ट' असे नाव दिले आहे. त्यानंतर सोनम वांगचुक यांनी केलेले हे ट्विट उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी रिट्विट केले आहे. तसेच आनंद महिंद्रा यांनी रिट्विट करताना, सोनम वांगचुक तू असा माणूस आहेस ज्याला मी सॅल्यूट करतो, असे त्यांनी लिहिले आहे. याशिवाय आपले कार्य हे दमदार असल्याची प्रशंसा देखील आनंद महिंद्रा यांनी केली आहे. 

दरम्यान, सोनम वांगचुक यांनी या टेन्ट बद्दल केलेल्या ट्विट मध्ये दहा वाजताचे बाहेरचे तापमान हे -14 अंश सेल्सिअस होते. त्याचवेळेस टेन्टच्या आतील तापमान हे +15 अंश सेल्सिअस होते. त्यामुळे बाहेरच्या तापमानापेक्षा टेन्टच्या आतील तापमान हे 29 अंशाने जास्त होते. आणि या टेन्टच्या वापरामुळे हिमालयात देशाची सुरक्षा करत असलेल्या जवानांना दिलासा मिळणार आहे. हा टेन्ट सौर ऊर्जेवर चालतो. त्यामुळे सैनिकांना उबदार ठेवण्यासाठी बर्‍याच टन रॉकेलचा वापर देखील कमी करता येणार आहे. व त्यामुळे होणारे प्रदूषण देखील रोखण्यास मदत होणार आहे.        

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com