काँग्रेस पक्ष हा कमकुवत झाला असल्याची आनंद शर्मा आणि कपिल सिब्बल यांची कबुली 

Congress
Congress

काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केरळ मधील वायनाडच्या दौऱ्यावर असताना उत्तर भारतीयांसबंधित केलेल्या वक्तव्यानंतर पक्षात मोठी फूट निर्माण झाली असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती मिळाली आहे. आणि याच पार्श्वभूमीवर कांग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून गांधी घराण्याच्या विरोधात उभे राहणारे ज्येष्ठ नेते पुन्हा एकदा आवाहन देण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. आज जम्मूमध्ये गांधी ग्लोबल फॅमिली पीस कॉन्फरन्ससाठी काँग्रेस पक्षातील जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांच्यासमवेत कपिल सिब्बल, भूपेंद्र सिंह हुड्डा, राज बब्बर, आनंद शर्मा, मनीष तिवारी आणि विवेक तनखा एकत्र आले आहेत. तसेच यावेळी कपिल सिब्बल यांनी बोलताना काँग्रेस पक्ष हा कमकुवत झाला असून, हे सत्य आपल्याला स्वीकारावे लागणार असल्याचे म्हटले आहे. 

जम्मूमध्ये सुरु असलेल्या ग्लोबल फॅमिली पीस कॉन्फरन्स मध्ये बोलताना काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी सध्याच्या घडीला पक्ष हा कमकुवत झाला असल्याचे म्हणत यासाठीच आपण एकत्र जमल्याचे म्हटले आहे. तसेच यापूर्वीही आपण यापूर्वीही एकत्र जमलो होतो आणि काँग्रेस पक्ष आपल्याला बळकट करायचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याशिवाय नुकतेच राज्यसभेचे खासदार म्हणून कार्यकाल संपलेले गुलाम नबी आझाद यांची खरी भूमिका कोणती आहे असा प्रश्न देखील कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला. व विमान उडवण्यासाठीचा वैमानिक हा एक अनुभवी व्यक्ती असतो. इंजिनमधील कोणतीही बिघाड शोधून ती दुरुस्ती करण्यासाठी इंजिनियर असतो. त्याप्रमाणे गुलाम नबी आझाद हे अनुभवी इंजिनियर असल्याचे कपिल सिब्बल यांनी म्हणत अप्रत्यक्षरीत्या काँग्रेस पक्षात सर्व काही आलबेल नसल्याचेच अधोरेखित केले आहे. 

याव्यतिरिक्त, गुलाम नबी आझाद यांना प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या काँग्रेसच्या जमिनीवरील वास्तविकतेची माहिती असून, त्यांनाच संसदेतून मुक्त करण्यात आल्याचे समजल्यानंतर आपल्याला वाईट वाटल्याचे कपिल सिब्बल यांनी पुढे सांगितले. शिवाय, गुलाम नबी आझाद यांची पुनर्नियुक्ती का करण्यात आली नाही हे देखील समजले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. व काँग्रेस पक्ष हा सध्याच्या घडीला अनुभवाचा वापर का करत नाही हे समजू शकत नसल्याचे कपिल सिब्बल यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे. कपिल सिब्बल यांच्यानंतर पक्षाचे नेते आनंद शर्मा यांनी देखील काँग्रेस पक्ष हा कमकुवत झाला असल्याचे म्हटले आहे. 

आनंद शर्मा यांनी गेल्या दशकात कॉंग्रेस पक्ष हा कमकुवत झाला असल्याचे मान्य करत, आपला आवाज हा पक्षाच्या उन्नतीसाठी असल्याचे म्हटले आहे. यानंतर पक्षाला पुन्हा मजबूत करणे गरजेचे असल्याचे म्हणत, नवीन पिढीने पक्षाशी कनेक्ट होणे आवश्यक असल्याचे आनंद शर्मा यांनी यावेळी नमूद केले. तसेच आम्ही कॉंग्रेसचे चांगले दिवस देखील पाहिल्याचे सांगत, आपण वयस्कर होत असताना काँग्रेस दुर्बल होताना पाहायची इच्छा नसल्याचे भावनिक मत आनंद शर्मा यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे. याव्यतिरिक्त, 1950 नंतर जम्मू आणि काश्मीर मधील एकही प्रतिनिधी राज्यसभेत नसल्याचे पहिल्यांदाच घडत असल्याचे त्यांनी पुढे सांगितले. आणि याची दुरुस्ती करण्यात येणार असल्याची पुस्ती त्यांनी जोडली. 

त्यानंतर, इथंपर्यंत येण्यासाठी फार मोठा टप्पा गाठला असल्याचे सांगत, आपल्यापैकी कोणीही खिडकीतून नाहीतर दरवाजातून आले असल्याचे आनंद शर्मा यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर विद्यार्थी चळवळ, युवा चळवळीद्वारे आलो असल्याचे आनंद शर्मा यांनी सांगितले. शिवाय, आपण कोणालाही काँग्रेसचे आहे की नाही हे सांगण्याचा अधिकार दिला नसल्याचे आनंद शर्मा यांनी म्हटले आहे. त्यामुळे पक्ष बनवू, मजबूत करू, असे म्हणत आपला विश्वास कॉंग्रेसच्या सामर्थ्यावर आणि एकतेवर असल्याचे आनंद शर्मा यांनी म्हटले आहे.             

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com