लष्करप्रमुखांनी घेतला पूर्व लडाखमधील एकूण लष्करी सज्जतेचा आढावा

दैनिक गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 24 डिसेंबर 2020

लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी बुधवारी पूर्व लडाखमधील उंचीवरील प्रदेशाला भेट देऊन भारताच्या एकूण लष्करी सज्जतेचा आढावा घेतला. गेल्या काही महिन्यांपासून चीनबरोबरच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा दौरा केला.

नवी दिल्ली- लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी बुधवारी पूर्व लडाखमधील उंचीवरील प्रदेशाला भेट देऊन भारताच्या एकूण लष्करी सज्जतेचा आढावा घेतला. गेल्या काही महिन्यांपासून चीनबरोबरच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा दौरा केला. लष्करप्रमुखांनी रेचिन ला सह इतर उंचीवरील ठिकाणांना भेट दिली. त्यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसी) चौक्यांना भेट दिली. त्याचप्रमाणे, एलएसीवरील परिस्थितीचीही पाहणी केली. 

पूर्व लडाखमध्ये दुर्गम पर्वतमय प्रदेशात भारतीय लष्कराचे ५० हजार जवान तैनात आहेत. चीननेही तितकेच जवान तैनात केले आहेत. बुधवारी सकाळी साडेआठलाच लष्करप्रमुखांचे लेहच्या एक दिवसीय दौऱ्यासाठी आगमन झाले. लेहमधील तुकडीचे कमांडर लेफ्टनंट जनरल पीजीके मेनन यांनी पूर्व लडाख परिसरातील परिस्थितीची माहिती लष्करप्रमुखांना दिली. नरवणे यांनी या परिसरातील जवानांशीही संवाद साधला. त्याच उत्साहाने काम सुरू ठेवण्याचे सांगत जवानांना प्रोत्साहित केले. त्यांनी नाताळनिमित्त मिठाई व केकही दिला. लष्कराने ट्विटवरून लष्करप्रमुखांच्या दौऱ्याबद्दल माहिती दिली. 

चीनबरोबरील वाद आणि हिवाळ्यातील तयारीचा आढावा या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुखांचा हा दौरा होता. पूर्व लडाखमधील चीनचे अतिक्रमण हा भारतासमोरील सर्वात मोठा मुद्दा असून त्याचा आढावा तसेच अचानक चीनकडून कारवाया केल्या गेल्या तर त्या पार्श्वभूमीवर भारताची तयारी कशी असेल याचा आढावा घेण्यसाठी लष्करप्रमुखांचा हा दौरा अतिशय महत्वाचा होता.

संबंधित बातम्या